राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जत नगरपरिषद यांच्या दुर्लक्षामुळे जत शहरातील शिवाजी पेठेतून जाणारे इस्लामपूर-चडचण या राष्ट्रीय महामार्गाची दुर्दशा!
महामार्गाचे काम त्वरीत सुरू करण्याची जत शहरवासियांतून व वाहनचालकांतून मागणी
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
जत शहरातून जाणारा इस्लामपूर-चडचण हा पूर्वी राज्यमार्ग होता.त्यामुळे या राज्यमार्गाकडे सबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे या राज्यमार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून हा मार्गावर वाहन चालकांना वाहने चालविताना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते.त्यामुळे अनेक अपघात ही होत होते.
परंतु आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे वर्ग झाल्याने या महामार्गाचे-रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे.कवठेमहांकाळ ते जत म.रा.वि.वि.कं.कार्यालयापर्यंत या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरणाचे काम झाले असले तरीही जत ते कवठेमहांकाळ दरम्यान अजून काही ठिकाणी हे डांबरीकरणाचे काम अपूर्ण असल्याने हे काम ताबडतोब पूर्ण करावे, अशी मागणी वाहन चालकांतून करण्यात येत आहे. जत शहरातील शिवाजी पेठेतील प्रमुख मार्गावरून हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने व या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून त्यामध्ये पाणी साचून राहिल्याने वाहनचालकांना या महामार्गावरून आपली वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या मार्गावर अनेक लहान मोठे अपघातही झाले आहेत.
त्यातच जत नगरपरिषदेची शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहीनी या रस्त्याच्या खालून जात असल्याने या महामार्गावर वरचेवर नगरपरिषदेची ही जलवाहीनी फुटून त्यातून येणारे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचून रस्त्यावर खड्डे पडत आहेत. तसेच पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी रस्त्यावर मोठ्ठे खड्डे काढल्याने या रस्त्याची पार वाट लागली आहे.
जत शहरातून जाणारे या महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम जत नगरपरिषद व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे रखडले असून या महामार्गावरून जाणे जत शहरवासियांना अपघाताला निमंत्रण दिल्यासारखेच आहे.त्यामुळे जत शहरवासियांतून व वाहनचालकांतून या यंत्रणाविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जत शहरातून जाणारे इस्लामपूर-चडचण या राष्ट्रीय मार्गावरील जत नगरपरिषदेच्या जुन्या जलवाहिन्या काढून त्याठिकाणी नविन जलवाहिन्या टाकून हे जत शहरातून जाणारे छत्रपती संभाजी महाराज चौक ते म.रा.वि.वि.कं.कार्यालय पर्यंतचे अपूरे राहिलेले डांबरीकरणाचे काम त्वरीत पूर्ण करावे,अशी मागणी जत शहरवासियातून व वाहनचालकांतून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन