मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव, कोंगनोळी, नागाव गावच्या सरपंचांशी साधला संवाद

कोरोनामुक्त गाव करण्यासाठी सरपंचांच्या भूमिकेबरोबरच कुटुंबातील महिलांचा सहभागही महत्वपूर्ण:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:

कोरोना मुक्त गाव करण्यासाठी सरपंचांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असून गावचा प्रमुख म्हणून आपलं गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी गावामध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजना यामुळे गाव कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करतयं यासाठी सरपंचांबरोबरच गावचे ग्रामस्थही त्यांच्या पाठीशी राहिले. कोरोना गाव मुक्तीत कुटुंबातील महिलांचा सहभाग महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या गावांच्या सरपंचांशी दूरदृश्यप्रणालीव्दारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसीमध्ये कडेगाव तालुक्यातील मोहित्यांचे वडगाव गावचे लोकनियुक्त सरपंच विजय मोहिते, कवठेमहांकाळ तालुक्यातील कोंगनोळीच्या सरपंच सौ. निता जाधव, वाळवा तालुक्यातील आष्टा-नागाव चे उपसरपंच धनवंतराव पाटील यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तानाजी लोखंडे आदि उपस्थित होते.मोहित्यांच्या वडगाव गावातील कोरोना मुक्तीच्या उपक्रमाची दखल घेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, मोहित्यांच्या वडगाव गावामध्ये सरपंच व सदस्यांनी गावातील सर्व कुटुंबातील महिला वर्गाला विश्वासात घेवून कोरोना मुक्तीच्या लढ्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज हे गाव कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. कुटुंबातील महिला ज्या पध्दतीने आरोग्याची काळजी घेतात, आपलं कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. आपल्या घरातील एखादा व्यक्ती मास्क शिवाय घराबाहेर जात असेल, असे त्यांच्या निदर्शनास आल्यास त्या तातडीने मास्क घालून जाण्याची सूचना करतात. या सारख्या छोट्या छोट्या सूचनांच्या अंमलबजावणीने आपण कोरोनावर मात करू शकतो. कोरोनावर मात करण्यासाठी त्रिसुत्रीचा (हात धुणे, मास्क वापरणे व सामाजिक अंतराचे पालन करणे) वापर करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, गेली दीड वर्षे आपण कोरोनाशी लढत आहोत. कोरोनाची पहिली लाट संपली आता दुसरी लाट सुरू आहे. ही लाट अत्यंत भयावह आहे. या लाटेत अनेकांनी आपले आप्तेष्ट, स्वकीय गमावले. ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. असल्या भयावह लाटेतही काही ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कोरोना नियंत्रणाचे काम केले. त्यामुळे कोरोनाला अटकाव करू शकलो. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा जाणवला तरीही आपण त्याच्यावर मात केली. त्यातच म्युकरमायकोसीस या रोगाचीही भर पडली. तरीही गावपातळीवर सावध राहून ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध बसला. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन केले. तसेच त्याची योग्य पध्दतीने गावचा प्रमुख म्हणून आपण अंमलबजावणी केली. त्यामुळेच आज आपली गावे कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. लवकरच आपण आपले गाव पूर्ण कोरोना मुक्त कराल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्य शासनाने कोरोना काळात टाकलेली बंधने हळूहळू शिथील करण्यासाठी पाच स्तर ठरविले आहेत. आपल्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात आपण कोणत्या स्तरात आहोत त्यानुसार शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. आपण जर खालच्या स्तरात असू तर आपण वरच्या स्तरात जाण्यासाठी प्रयत्न करावेत. येणारा काळ हा सणासुदीचा काळ आहे. या काळात गर्दी होणार नाही आणि कोरोना वाढणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. गर्दी वाढल्यास कोरोना वाढेल आणि मग परत लॉकडाऊन अटळ आहे. त्यामुळे गर्दी टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यावेळी केले.मोहित्यांच्या वडगावचे सरपंच विजय मोहिते यांनी गावात राबविण्यात आलेल्या कोरोना मुक्तीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देताना सांगितले, गावची लोकसंख्या 3 हजार 366 इतकी आहे. आमच्या गावात 67 रूग्ण कोरोना बाधीत झाले. यावर यशस्वीपणे उपचार करून ही संख्या आता 4 वर आली आहे. कोरोना मुक्त करण्यासाठी गावामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. गावातील महिला वर्गाला विश्वासात घेवून कोरोना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केल्याने आणि गावातील महिलांनी तितक्याच चांगल्या पध्दतीने प्रतिसाद दिल्याने गाव कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गावामध्ये लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक आंतर पाळणे याबाबत मार्गदर्शन आणि प्रबोधन केले. आमचा गाव लवकरच कोरोना मुक्त होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच मा. मुख्यमंत्री महोदय यांनी आमच्या कामाची दखल घेवून आमच्याशी थेट संवाद साधला याबद्दल मी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार मानतो, असे शेवटी ते म्हणाले.