मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना इ-मेलद्वारे निवेदन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च 2020 पासून कोरोना संसर्ग रोखण्याच्या कामाअंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. 31 डिसेंबर 2020 अखेर कोरोना सेवा बजावत असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा संरक्षण दिले होते. पण अद्याप एकाही मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना या विमा संरक्षणाचा लाभ शासनाकडून देण्यात आला नाही. महाराष्ट्रामध्ये असे जवळजवळ 70 शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना पन्नास लाख रुपये विमा रकमेचा लाभ तात्काळ देण्यात यावा व कोरोना योद्धा शिक्षकांना ” कुटुंब सुरक्षा विमा योजना ” लागू करण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी शासनाकडे ई-मेल पाठवून केली.
मार्च 2020 पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना संसर्ग रोखण्याच्या कार्यात राज्यातील शिक्षकांना गावातील कुटुंबांचे सर्वेक्षण करणे, सीमा बंदीवरील चेक पोस्टवर काम, कॉल सेंटरवर काम, आयसोलेशन कक्षामध्ये काम, लसीकरण केंद्रावर काम,रेशन दुकानावर रेशन वाटपासाठी मदत करण्याचे काम, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये विविध माहितीचे संकलन करण्याचे काम, जनजागृतीचे काम अशी अनेक कामे देण्यात आली असून ही कामे शिक्षक कर्मचारी प्रामाणिकपणे करत आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची ही कामे करत असताना कोरोना योद्धा शिक्षक स्वतःच्या जीवा बरोबरच कुटुंबाचाही जीव धोक्यात घालून काम करत आहे. कर्तव्य बजावत असताना अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले आहेत. काही शिक्षकांचा मृत्यू झाला आहे, तर काही शिक्षकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यामुळे त्यांना लक्षणं दिसून येत नाहीत, पण त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना बाधित झालेल्या आहेत. किंबहुना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा कोरोनाने मृत झाल्या आहेत. अशावेळी कोरोना योद्ध्याच्या कुटुंबातील आई ,वडील ,पत्नी व मुले यांनाही विमा संरक्षण मिळणे गरजेचे आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षकांना व शिक्षण सेवकांना विना अट ” कुटुंब सुरक्षा विमा योजना लागू करण्यात यावी ” तसेच कोरोना योद्धा शिक्षक कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती बाधित झाले तर तात्काळ त्यांना विनाविलंब आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघ जुनी पेन्शन संघटना तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील व सांगली जिल्हा अध्यक्ष अमोल माने यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे ई-मेल द्वारा निवेदन पाठवून केली आहे.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक