कर्नाटकातील चिंचणी मायाक्का,सौदंत्ती रेणुका यात्रेने महाराष्ट्राला कोरोनाचा धोका?

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

कर्नाटक सरकारने आठ लाख भाविकांचे उपस्थितीत भरणाऱ्या बेळगाव जिल्ह्यातील श्री.क्षेत्र चिंचणी मायाक्का व श्री. क्षेत्र सौदत्ती रेणुका देवीची यात्रा रद्द न करता त्याला परवानगी दिल्याने सांगली, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या ही वाढण्याच्या शक्यतेने या दोन्ही जिल्हयात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाचे पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,गोवा या राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कर्नाटक राज्यातील चिंचली येथील श्री. मायाक्का देवीची व सौंदत्ती येथील श्री. रेणुका देवीची यात्रा यावर्षी रद्द न केल्याने या यात्रेनंतर सांगली, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याच्या शक्यतेने प्रशासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या महामारीचा विषाणू जगात थैमान घालीत असून या महामारीने जगातील लाखो लोकांचा बळी घेतला आहे.कोरोनामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था कोसळली आहे.
सद्य परिस्थितीत भारतासह अनेक देशांनी कोरोनावर मात करण्यासाठी व्हॅक्सीनची निर्मिती केली आहे. जगभर कोरोनाची व्हॅक्सीन रूग्णांना देण्यात येत आहे. असे असले तरी भारतासह अनेक देशांत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रवेश केला असून ही कोरोनाची महामारी पहिल्या महामारीपेक्षा गंभीर समजली जात आहे.
त्यातच महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलाॅक प्रक्रिया राबविल्याने राज्यातील जनतेला महाराष्ट्रातून कोरोना ही महामारी हद्दपार झाली आहे,असा साक्षात्कार झाल्याने राज्यातील जनतेने कोरोनाबाबतीत असलेले नियम पायदळी तुडविले आहेत.याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक महानगरामध्ये कोरोनाने परत शिरकाव केला असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाॅटस्पाॅट जाहीर करण्यात आले असून या जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कठोर नियम लावण्यात आले आहेत, तर काही जिल्ह्यात जमावबंदीचा आदेश लागू केले आहेत.
अशी परिस्थिती असताना व पुणे,मुंबई या ठिकाणी कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अशा परिस्थितीत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील श्री. क्षेत्र चिंचणी मायाक्का व श्री. क्षेत्र श्री. सौंदत्ती रेणुका देवीच्या आठ-दहा लाख भाविकांचे उपस्थितीत पार पडणाऱ्या यात्रेला कर्नाटक सरकारने परवानगी दिल्याने या यात्रेमुळे महाराष्ट्र राज्याची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर जिल्ह्यासह पुणे व मुंबई येथील लाखो भाविक या यात्रेसाठी येणार असल्याने व सद्या पुणे, मुंबई हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट झाल्याने येथील भाविक या यात्रेसाठी येणार असल्याने कोरोनाचा प्रसार या यात्रेतून महाराष्ट्रभर पसरला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे व मुंबई येथून भाविक हे खासगी ट्रॅव्हल, महामंडळाचे बसने तसेच रेल्वे व आप-आपल्या खासगी वाहनाने येणार असल्याने कोरोनाच्या बाबतीत असलेल्या नियमांचे यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटराइजचा वापर हे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे अशक्य होऊन कोरोना वाढणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून महाराष्ट्र सरकार व प्रशासन याबाबतीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.