जत नगरपरिषदेच्या नियमबाह्य कामकाजाबाबत नगरविकामंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे : विक्रम ढोणे

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:

जत नगरपरिषदेचा कारभार शासकीय नियमानुसार न होता मनमानी पद्धतीने सुरू असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नियमबाह्य व भ्रष्ट कामकाजाबाबत लक्ष घालावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केले आहे

जत नगरपरिषद अंतर्गत होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन व इतर विविध विकासकामे राबवण्याची ई निविदा प्रक्रिया शासन नियमानुसार राबवली जात नाही.जाचक नियम, अटी घालून ठराविक ठेकेदारांनी भाग घ्यावा या हेतूने आजपर्यंतच्या सर्व ई निविदा प्रक्रिया राबवली जाते.याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी,निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तर जिल्हा प्रशासनसुद्धा याकडे गांभीर्याने पाहत नाही. फक्त कागदोपत्री सोपस्कार पार पाडला जातो. जिल्हा प्रशासनाची या मनमानी कारभाराला मूकसंमती आहे का ? असा प्रश्न पडतो.
जत नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय चौकशी झाल्या. चौकशी अहवाल प्राप्त झाले असून चौकशी अहवालातून भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. कोट्यवधी रुपये वसुलपात्र आहेत. अनेक गंभीर दोष निदर्शनास आले आहेत.तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. यावरून जत नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराला जिल्हा प्रशासनाचा पाठिंबा असल्याचे दिसून येते.पण शासकीय निधीचा मनमानी पद्धतीने गैरवापर केल्याचे दिसून येते. जत नगरपरिषदेचा सर्व कारभार हा मनमानी पद्धतीने सुरू असून शासन नियमावली व परिपत्रकानुसार कोणतेही कामकाज होत नाही.
गुलाब गिरणी ते नागू दुकान, डॉ.पाटील ते साले घर , हराले वस्तीतील विठ्ठ्ल मंदिर शेजारील रस्ता व हराले समाज स्वागत कमान ते शिंदे घर हे चारही रस्ते तीन वर्ष उलटली,पण रस्ते अर्धवट स्थितीत आहेत.
त्यामुळे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीच जत नगरपरिषदेच्या नियमबाह्य कामकाजाबाबत लक्ष घालावे व भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या प्रकरणावर तातडीने कारवाई करावी,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केले आहे.
नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाजसुद्धा शासन नियमाने चालवले जात नाही.