प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:
देशातील सामाजिक सुधारणा व राजकीय क्रांतीसाठी त्या काळात पत्रकारिता केली गेली.
आज पुन्हा तीच वेळ आलीय …पत्रकारांवर होणा-या असमानतेबाबत, अन्यायाबाबत सामाजिक क्रांती करण्याची!
भेदाभेद मिटवण्याची!
आपण स्वतंत्र देशात असूनही नव्या कायद्याने वेठबिगार व गुलामीकडे जातोय.
या विरोधात बोलणं ,लिहिणं आणि घटनेने दिलेले आपले हक्क, अधिकार मिळवणं ,चौथा स्तंभ म्हणून सन्मान्य जगण्यासाठी मैदानात ठाम उभं राहणं आवश्यक आहे.
इथे आपत्तीकालात तर प्रचंड विषमता दिसली.
हजारो पत्रकार व कर्मचारी बेकार झाले,काहीजण विनावेतन काम करत आहेत.
नोकरी जाण्याची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे!दडपण आहे!
तर दुसरीकडे मूठभर लोक मजेत जगत आहेत!
यावर एनयुजे महाराष्ट्रने ११डिसेंबर२०२०ला आझाद मैदानात आवाज उठवून जी क्रांतीची मशाल पेटवली आहे,ती आता आणखी प्रखर करण्याची नितांत गरज आहे!
आपण पत्रकार दिन साजरा करायचा पण ते करताना आपली लेखणीची धार तळपती ठेवा,आपले हक्क मिळेपर्यत शांत बसायचं नाही.
आपले हक्क चोर भामटे घेतात,ते बाहेर गेले पाहिजेत.पत्रकार रजिस्ट्रेशन होणे अत्यावश्यक आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे आपले मंत्रालय असते.आणि आजवर असे दिसून आलेय की , अचूक न्याय दिला गेला नाही ,काही मूठभर लोक आपले खिसे भरत राहिलेत.
आपले हक्क आणि पत्रकार म्हणून लाभ अगदी गावपातळीपर्यतच्या आपल्या बंधू भगिनीपर्यंत पोहोचले पाहिजेत.
त्यासाठी आपले महामंडळ हवेच!
आपले हक्कासाठी लढायला त्रिपक्षीय समिती हवी!
जर मुख्यमंत्र्यांना आमच्या वेदना कळत नसतील ,तर त्या समजवून देऊन वेळीच सोडवण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.
हा महाराष्ट्र शिवरायांचा,शाहू,फुले,टिळक, आंबेडकरांचा,समाजसुधारक आगरकरांपासून ते प्रबोधनकार ठाकरे यांचा!
झाशीची राणी पासून ते क्रांतीज्योती सावित्रीचा!
प्रचंड मोठी अशी तेजाची परंपरा पत्रकारिता,समाजसुधारणा आणि राजकीय पत्रकारितेची आहे.
मा.बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे आणि मर्मावर घाव करणारी मार्मिक लेखनशैली ही प्रेरणादाई होती.महाराष्ट्राची वेगळी ओळख व शान होती .
आपले दमन होताना जो गप्प राहिल तो या उज्ज्वल पत्रकारितेचा पाईक नाही हे त्रिवार सत्य आहे.
तेव्हा केंद्राच्या काळ्या कायद्या विरोधात लढाई सुरु ठेवायची आहे.
आणि महाराष्ट्र सरकारकडून आपले सन्मान मिळवायचे आहेत !
हे मिळेपर्यत ही लढाई आपल्या माध्यमांतून,समाजमाध्यमांतून सुरु राहिल.
यंदाचा हा पत्रकार दिन आनंदाचा नाही,आत्मक्लेशाचा आहे.
गुणीजनांचे कौतुक निश्चित व्हावे,पण आपलं लक्ष्य, आपले हक्क व सन्मान मिळवण्याकडेच असायला हवे.
आज गप्प राहिलात तर संपलात !
स्वातंत्र्य देवता आपल्याला कधीही माफ करणार नाही.
सक्षम लोकशाहीसाठी,समाजासाठी पत्रकार सन्मान अत्यावश्यक!
आणि तो आपणच मिळवायचा!
आपण ज्यांना मतदान केलीयं, जे सत्तेत आहेत ,ते जर झोपेचं सोंग घेत असतील तर त्यांचे डोळे आणि बुद्धी खुली करण्यासाठी आवाज मोठा करायलाच हवा.
आपण याचक नाही ,लोकशाहीचा सन्मान्य असा ताकदवान चौथा स्तंभ आहोत.
पत्रकारिता दीनावस्थेकडे जातेय ते आपणच रोखू शकतो आणि रोखणार आहोत.
यातील चाचे,लुटारु उचलून बाहेर फेकायचे आहेत.
या डाकुंना आपले हक्क देणा-यां दलालांना त्यांची जागा दाखवायची आहे.
मला विश्वास आहे,आपली एकसंघ शक्ती क्रांती घडवेल!
तो दिवस जवळ आलाय.चौथा स्तंभ सक्षम होऊन सन्मानाने उभा राहणार!
जय भवानी! जय महाराष्ट्र!
जय लोकशाही!
शीतल करदेकर
अध्यक्ष
नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र
सचिव
एनयुजे इंडिया,नवी दिल्ली
7021616645


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक