गावातील समस्या गावातच सोडवा – श्रीकांत पाटील; सनमडी गौरव पुरस्कार २०२० चे वितरण

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

गावचे कारभारी म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक, सदस्य यांची अनेक वर्षांपासूनची ओळख आहे.कारभाऱ्यांचा कारभार चांगला असल्यास गावचा विकास गतीने होतो. गावातील प्रत्येक नागरिकांनी निर्धार केल्यास आदर्श गाव निर्माण होते.प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून गावातील सर्व नागरिकांच्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण घेवून गावातील समस्या गावातच सोडवा असे मत सोलापूर जिल्हाधिकारी चिटणीस श्रीकांत पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून आयकर आयुक्त मुंबई डॉ.सचिन मोटे ,डॉ.कैलास सनमडीकर , हैद्राबादचे गोल्डन मॅन अक्षय अर्जुन,उद्योजक विनायक मासाळ,प्रा. नारायण खरजे ,निल-गंगा फायनांन्शिअलचे संस्थापक-अध्यक्ष तुकाराम धायगुडे, जत नगरसेवक भुपेंद्र कांबळे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य , ग्रामसेवक ,पोलिस पाटील व शिक्षक यांनी एकजुटीने निर्धार केल्यास गावाचा कायापालट व्हायला वेळ लागत नाही. राज्यात विकासात आदर्श असलेले राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, अशा गावांना भेटी दिल्या पाहिजेत. या गावांत राबविलेल्या विकासाचा पॅटर्न आपल्या गावात राबविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे. प्रत्येक सदस्याने शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून आपले वॉर्ड आदर्श केल्यास गाव आदर्श होईल. त्यासाठी निवडून आल्यानंतर गट-तट बाजूला ठेवून पारदर्शीपणे लोकसहभाग घेऊन योजनांची अंमलबजावणी करावी व ग्रामसेवकांच्या माध्यमातून योजनांचा पाठपुरावा करावा.
आयकर आयुक्त डॉ.सचिन मोटे म्हणाले, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांकडे सर्वांनी लक्ष दिलेच पाहिजे.सनमडी गौरव पुरस्कार समितीने अशा पद्धतीचा पुरस्कार देवून त्यांना भविष्यात काम करण्यासाठी उर्जा देण्याचे काम केले आहे. सकारात्मकता, नि:स्वार्थी, विकासात्मकदृष्टी ठेवून धडपडत राहिल्यास गावचा चेहरामोहरा बदलणे शक्य आहे. गावातील विविध विषयांतील ज्ञानी, नि:स्वार्थी लोकांना एकत्र करून काम केल्यास विकासकामे गतीने करता येतात.
डॉ.कैलास सनमडीकर म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनात्मक अधिकारामुळे आम्ही आज चांगले शिक्षण घेवू शकलो.जीवनात यशस्वी व्यहायचे असेल तर प्रत्येकांनी अगोदर शिक्षण घेणे गरजेचे आहे.पारंपरिक शिक्षणाबरोबर कुठल्याही प्रकारचा खेळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या जीवनात खेळ हा अविभाज्य घटक असून, खेळामुळेच जीवनातील यशापयश पचवण्याची सवय लागते.
गेल्या वर्षी मला या ठिकाणी सनमडी गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.सनमडी गौरव पुरस्कार समितीने चालविलेला उपक्रम काम करणाऱ्यांना बळ देण्याचे काम करत आहे.काही माणसं झपाटलेली असतात.जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो. विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत पणाला लावून ते आपलं ध्येय गाठतातच.मूळचे सनमडीचे व सध्या जत येथे राहत असलेले पंडित तुकाराम धायगुडे यांनी मुंबईत २५७ किलो वजनाच्या दोन बाइक लागोपाठ १२२ वेळा आपल्या पोटावरून जाऊ देत त्यांनी आज विश्वविक्रमाला गवसणी घालत त्यांची आज गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे.अशा या शुरवीराला सनमडी गौरव पुरस्कार देवून सन्मानित केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक अशोक गोरड ,सुनिल सनमडीकर ,तुकाराम पाटील ,मधूकर नरळे ,महादेव पवार आण्णाराव पाटील ,भाऊसो महानोर,व्यंकटेश नरूटे उपस्थित होते.