कृषी विधेयकाच्या निषेधार्थ सांगलीत ‘स्वाभिमानी’ची निदर्शने!

सांगली/ प्रतिनिधी:
केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.त्यानंतर विधेयकाच्या प्रती फाडून निषेध करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.यावेळी ‘रद्द करा,रद्द करा कृषी विधेयक रद्द करा’, ‘शेतकऱ्यांना देशो धडीला लावणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,केंद्र सरकारने नुकतीच संसदेत तीन कृषी विधेयके पाशवी बहुमतांच्या जोरावर मंजूर करून शेतकऱ्यांना मातीमोल करण्याचा विडा उचलला आहे. शेतकरी हितापेक्षा व्यापारी आणि उद्योगपतींना फायदा होण्याच्या दृष्टीने ही बिले तयार करण्यात आली आहेत. शेतकऱ्यांना आजादी देण्याच्या हेतूने तयार केलेली बिले शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ढकलणारी आहेत.एमएसपी रद्द करून सर्वच संरक्षण काढून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे.कॉन्ट्रॅक्ट फर्मिंगच्या माध्यमातून उद्योगपतींना खुली सुट आणि शेतकऱ्यांना मजूर बनविणारे धोरण आखले जात आहे.शेतीमाल साठवणुकीसाठीही सवलत देण्यात आली आहे.त्यामुळे व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे होणार आहे.तसेच बाजार समितीच्या बाहेर खरेदी झालेल्या शेतीमालाची खरेदी करण्यासाठी कोणतेही बंधन नाही.शेतीमालाची कुठेही खरेदी झाली, तरी ती एम एस पी च्या खाली करता येणार नाही,असे बंधन घालणयात येणे आवश्यक आहे. अकदारीताच वरवर शेतकरी हिताची भाषा करणारे शेतकऱ्यांना गुलाम करत आहेत. या विधेयकापेक्षा कमी व्याजदराने पीक,मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा, शेतीमाल वाहतुकीसाठी रेल्वेची सुविधा, हमीभाव, साठवणीसाठी वेयर हाऊस, कोल्ड स्टोअरेज, प्रिकुलींग युनिट आदींची व्यवस्था केल्यास शेतकऱ्यांना अन्य विधेयकाची गरज नाही.
यावेळी भरत चौगुले,श्रीधर उधगावे,बाळासाहेब लिंबेकाई,सुरेश पचिब्रे,मारुती देवकर, प्रल्हाद पाटील, आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.