सांगली/प्रतिनिधी:
गेल्या 4 दिवसांपासून सागरेश्वर अभयारण्य देवराष्ट्रे येथे सुरु असलेले वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषणास शासकीय कागदपत्रे गायब प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हा नोंद करण्याच्या कारवाईचे पत्र घेत व इतर मागण्यांची विभागीय चौकशी करणेचे लेखी पत्र विभागीय वन अधिकारी माळी यांनी आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आली.
याबाबत आणखी माहिती अशी की, देवराष्ट्रे येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्यातील विविध विकास कामांत करोडोंचा भ्रष्टाचार झाला असून याबाबतची काही कागदपत्रे जाणीवपूर्वक केली असलेने याची चौकशी करत तात्काळ कारवाईच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी व ग्रामस्थ देवराष्ट्रे यांचे वतीने चार दिवसांपासून वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद मिसाळ, अमोल गायगवाळे, विनीत कांबळे हे उपोषणास बसले होते, विविध पक्ष व संघटना व ग्रामस्थांच्या सहभागाने या आंदोलनाची तीव्रता खूप वाढली होती. या आंदोलनस्थळी आज सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी व नायब तहसीलदार यादव यांचे समक्ष विभागीय वन अधिकारी माळी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत शासकीय कागदपत्रे गायब प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना दिले. तसेच इतर दोषींवर 15 दिवसांत विभागीय चौकशी करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिल्यावर सदर आंदोलन स्थगित करणेत आले.
जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी सर्व ग्रामस्थ, मित्रपरिवार, पदाधिकारी कार्यकर्ते, प्रसारमाध्यमे तसेच पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्ष व संघटनांचे आभार मानत उपोषणास स्थगिती दिली.
यावेळी रिपाईचे नेते महादेव होवाळ, विशाल तिरमारे, विजय गवाळे, सरपंच प्रकाश मोरे ग्रामस्थ बाबासो महिंद डॉ.प्रमोद गावडे, डॉ. राजेश साठे, श्रीदास होनमाने, सुधीर थोरात यांसह ग्रामस्थ व कार्यकर्ते उपास्थित होते.
संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन