पुराच्या पाण्याचे शेटफळेत पूजन;राष्ट्रवादीच्या मागणीला यश : सुरज पाटील


मोहनराव पुजारी 
आटपाडी/ प्रतिनिधी:

पुराचे पाणी शेटफळे गावासह परिसरातील भागात दाखल झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागणीला यश आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील यांनी शेटफळे येथे पाणीपूजन कार्यक्रमावेळी केले. कचरेवस्ती तलावातील पाणी गोंदीरा ओढा पात्रात सोडून माडगुळे परिसरातील सर्व बंधारे,ओढे-नाले भरून घेण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुराच्या पाण्याने टेंभू योजनेतून शेटफळे येथील रेबाई तलाव व ओड्यावरील बंधारे भरून घेण्याची मागणी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आली होती. जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्याची दखल घेऊन पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच टेंभू योजना सुरू करून दुष्काळी भागातील तलाव पाण्याने भरले आहेत. हे पाणी मोफत सोडले आहे. त्याचे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पूजन केले. यावेळी राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष सुरज पाटील, शेटफळेचे अध्यक्ष किशोर गायकवाड, प्रा.संभाजी पाटील,उपसरपंच प्रकाश गायकवाड, महेश जवळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.