धावडवाडीचे सुपुत्र बालम मुजावर यांना साप्ताहिक शिवकाळकडून कोरोना योद्धा पुरस्कार प्रदान

अनिल मदने
जत/प्रतिनिधी:

धावडवाडी ता.जत येथील बालम मुजावर यांना साप्ताहिक शिवकाळ कडून “कोरोना योद्धा पुरस्कार” मिळाला आहे. हा पुरस्कार साप्ताहिक शिवकाळचे कार्यकारी संपादक नितीन कांबळे यांच्या हस्ते बागेवाडी येथील ग्रामपंचायत येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार देताना बागेवाडी येथील सर्व पदाधिकारी व साप्ताहिक शिवकाळची टीम उपस्थित होती.
बालम मुजावर हे सध्या बागेवाडी व प्रतापूर या दोन्ही गावचे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत.बालम मुजावर यांनी आजपर्यंत गुगवाड, वज्रवाड, बसर्गी, सिंदूर,तिप्पेहळ्ळी, गुळवंची, प्रतापूर,घोरपडी,बोरगाव व बागेवाडी या गावात सेवा बजावली आहे.
माणसाने लोखंडावर कितीही दगडाला घासले तरी तो सोन्याचा होत नाही, त्याला परिसच लागतो. याप्रमाणे बालमभाईंनी आपल्या कार्याने अनेकांच्या जीवनाचे सोने केले आहे. बालमभाईंनी अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे.ज्या गावात बालमभाई सेवेत असत त्या गावच्या लोकांना ते एखाद्या देवदूताप्रमाणे वाटत असत. सरकारी नोकरी करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. कित्येकदा हे संकट कोरोनाप्रमाणे जीवावरही बेतते,परंतू या संकटांना तोंड देत आपले कर्तव्य पार पाडणे महत्त्वाचे असते.
बालमभाई गुळवंची आणि प्रतापूर या ठिकाणी कामावर असताना लोक अक्षरशः कृतज्ञतेने त्यांच्या पायाला हात लावू पाहतात. ग्रामपंचायतीची कामे करताना अनेकदा गोरगरीबांची थकलेली घरपट्टी असो, एखाद्याचे पैशाअभावी खोळंबलेले काम असो वा ग्रामपंचायतीच्या शिपायाचा रखडलेला पगार असो हे सर्व बालमभाईंनी कित्येकदा आपल्या स्वतःच्या पैशांनी सर्वांच्या गरजा पूर्ण केल्या आहेत.
हा मिळालेला पुरस्कार म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावतीच आहे.या पुरस्काराने बालमभाईंनी आपल्या गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.यापुढेही बालमभाईंनी असेच कर्तृत्व करत आपले व आपल्या गावाचे नाव उज्वल करावे अशी प्रतिक्रिया गावकरी व्यक्त करत आहेत.