
अनिल मदने
जत/प्रतिनिधी:
सांगली मंडळ कार्यालय वीज सुरक्षा साधने व कोरोना सुरक्षा साधनाचे आदेश येऊन देखील लाईनस्टाफ ना वाटप करण्यात आले नाही. सध्या वारा वादळाचे व पावसाचे दिवस असताना लाईनस्टाफना विजेची सुरक्षा साधने व कोविड-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणतीही साधने न दिल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. MSEDCL ही आशिया खंडातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी आहे. सर्व शहरी व ग्रामीण भागात रात्रंदिवस वीज सुरळीत ठेवण्यासाठी लाईनस्टाफ अथक परिश्रम घेत आहेत. कोरोना काळात सर्वाना घरात बसण्यासाठी वीज सुरळीत ठेऊन आपले कर्तव्य पार पाडले आहे,पण त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सांगली मंडळ कार्यालय जबाबदारी घेत नाहीत.
इलेक्ट्रिसिटी लाईनस्टाफ असोसिएशनचे केंद्रीय पदाधिकारी सुनिल माने आणि पदाधिकारी यांनी वारंवार भेटून सांगली मंडळ कार्यालयातील अधिकारी यांना सुरक्षा साधने देण्यासाठी विनंती केली.परंतु प्रशासन याची कोणतीच जबाबदारी घेत नाही. प्रत्येक दोन वर्षाला सुरक्षा साधने वाटावी असा आदेश आहे, तसे तर प्रत्येक वर्षी सुरक्षा साधने देणे गरजेचे आहे. परंतु मुख्यालयाचे पत्र येऊन देखील सांगली मंडळ कार्यालय प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे ELA या संघटनेने 15 दिवसात वीज सुरक्षा साधने व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणारी सुरक्षा साधने खरेदी करून प्रत्येक विभागामार्फत वाटप न केल्यास सांगली मंडळ कार्यालयासमोर थाळी नाद आंदोलन करणार असल्याचे सुनिल माने यांनी सांगितले.
तसेच विजेची देखभाल करताना कुणाचा प्राणांतिक किंवा अप्राणांतिक अपघात झाल्यास सुरक्षा साधने न पुरवणाऱ्या सांगली मंडळ कार्यालयावर जबाबदारी राहील असे सांगितले. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊन सांगली जिल्ह्यात जर कुणाचे बरेवाईट झाल्यास त्यालाही कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षा साधने न पुरवणारे सांगली मंडळ कार्यालय जबाबदार राहील असे पत्र महावितरण मुख्यालय मुंबई यांना तसेच प्रादेशिक कार्यालय पुणे, परिमंडळ कार्यालय कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली यांना देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन