पत्रकारांमध्ये भेदभाव करणारे उल्हासनगर पालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर कारवाई करणेची एन.यु.जे.महाराष्ट्र ची मागणी

सांगली/प्रतिनिधी:
जनसंपर्क अधिकारी हे पद प्रशासन व जनतेत समन्वय साधण्यासाठी निर्माण केलेले पद असताना उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे हे पत्रकारांत दुजाभाव करीत असल्याची तक्रार “दैनिक बातमीदार” या दैनिकाचे अधिकृत प्रतिनिधी सिद्धांत गाडे यांनी एन.यु.जे महाराष्ट्र या संघटनेकडे केली. दि. 23 ऑगस्ट रविवार रोजी कोरोनाविषयक माहिती घेण्यासाठी पायपीट करीत महापालिकेत सिद्धार्थ गाडे गेले असता त्यांना युवराज भदाणे यांनी दुजाभाव करत अपमानस्पद वागणूक दिली.
दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान वरिष्ठ पत्रकार सिद्धांत गाडे हे पत्रकार कक्षात जाण्याच्या उद्देशाने महापालिका गेट जवळ आले असता, ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षक पंचू यादव याने ‘आपको प्रवेश देनेके लिए भदाणे साहाबने मना किया है’ असे सांगून महापालिकेत प्रवेश देण्यास मज्जाव केला. यावर गाडे यांनी इतर पत्रकार महापालिकेत उपस्थित असताना मलाच का अडवता ? असे विचारले असता,’सिर्फ आपके लिये भदाणे साहाबने मना किया है !’ असे सांगितले.
केवळ हेच नाही तर अनेक उदाहरणे भदाणे यांचे मनमानीबद्दल वारंवार चर्चेत आहेत! भदाणे वारंवार पत्रकारांमध्ये भेदभाव करत असल्यामुळे उल्हासनगर मधील अनेक स्थानिक पत्रकारांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळू देत नाही.हे अधिकारी उर्मट भाषेत दमदाटी करत विविध कारणे सांगत भेदभाव करत असतात, यामुळे या महत्त्वाच्या जबाबदार अशा शासनाच्या पदाची प्रतिमा मलीन होत आहे.

अशा वादग्रस्त अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी,असे नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी उल्हासनगर पालिका आयुक्तांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवून केली आहे,असे एनयुजे महाराष्ट्राचे प्रवक्ते संदीप टक्के यांनी प्रसिद्धीस दिले आहे.