
उन्हाळी भात शेतीचे नुकसान
शेतकरी हवालदिल नुकसान भरपाईची मागणी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
पाली/बेणसे
मुंबई गोवा महामार्गावर पुगाव, मूठवली बुद्रुक व खांब गाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात उन्हाळी भात शेती केली जाते. हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेती मधून शेतकऱ्यांना हुकमी पिक व उत्पन्न मिळते. मात्र अवकाळी पावसामुळे हे हुकमी पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या येथे पाण्याने भरलेल्या शेतात भात कापणीची व झोडणीची कामे सुरु आहेत.
काही दिवसांपूर्वी शेतकर्यांची उन्हाळी भात शेतीच्या कामांची लगबग सुरु होती. टपोऱ्या भाताच्या लोंब्या डोलू लागल्या होत्या. त्यामुळे हाती भरघोस पीक लागणार यामुळे शेतकरी सुखावले होते. अनेकांनी 10 मे नंतर भात कापणीचे नियोजन सुद्धा केले होते. मात्र ऐनवेळी अवकाळी पावसाने घात केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकाचे नुकसान झाले आहे. शेतामध्ये पाणी साठले आहे. नाईलाजाने भिजलेला भात शेतकऱ्यांना कापावा लागत आहे. या भाताला भाव देखील मिळणार नाही. तसेच पेंढा भिजल्याने पेंड्याला देखील भाव मिळणार नाही. यामुळे शेतकरी अतिशय चिंतेत आहेत.
मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडल्याने शेतामध्ये पूर्णपणे पाणी साठले. भात पूर्णपणे भिजला आहे. हाती आलेले भातपीक पूर्णपणे भिजले आहे. त्यामुळे ते खराब झाले आहे. त्याला भाव देखील मिळणार नाही. तब्बल 25 ते 30 हजारांचे नुकसान झाले आहे. शासनाने याची दखल घेऊन ताबडतोब पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती आहे.
चंद्रकांत यशवंत येळकर, शेतकरी, पुगाव, ता. रोहा
हुकमी पीक
हमखास पाणी, पोषक वातावरण, शेतीची योग्य मशागत आणि हवामानाची साथ यामुळे उन्हाळी भात शेती मधून शेतकऱ्यांना हुकमी पिक मिळते. पावसाळ्यातील शेतीतून मिळणाऱ्या उत्पादन व उत्पन्ना पेक्षा उन्हाळी शेतीतून अधिक चांगले उत्पादन व उत्पन्न मिळते. त्यामुळे शेतकरी समाधानी असतात. काही शेतकरी तर पावसाळ्या एैवजी उन्हाळी शेती करण्यासच प्राधान्य देतात. मात्र यंदा अवकाळी पावसाने उन्हाळी भात शेतीचे मोठे नुकसान केले.

संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती