
सादिक खाटीक यांचे शासनासह लोकप्रतिनिधींना साकडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, कथित नव्या अन्यायी प्रस्तावाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यावर पुन्हा होवू पाहणारा अन्याय, शासनकर्त्यांसह लोक प्रतिनिधींनी तातडीने रोखून आटपाडी तालुक्याच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा . असे आवाहन आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार, शेतकरी साहित्य इर्जिक परिषद महाराष्ट्रचे प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याच्या राजेवाडी गावातल्या म्हसवड तलावाचे फलटण येथील विभागीय कार्यालयातील व्यवस्थान सातारा येथे, पंढरपूरचे उपविभागीय कार्यालयातील व्यवस्थापन गोंदावले येथे तर महुद येथील पुर्वीच्या शाखा कार्यालया बरोबरच आणखी एक शाखा कार्यालय म्हसवड येथे सुरु करण्याचा नवा प्रस्ताव सातारा जिल्ह्यातील एका नेत्याच्या आग्रहावरून अधिकारी महोदयांनी राज्य शासनाकडे पाठविल्याचे समजले आहे. या कथीत प्रस्तावाच्या अनुषंगाने, पुन्हा आटपाडी तालुक्यावर मोठा अन्याय होवू शकतो.
पाणलोट क्षेत्र सातारा जिल्ह्यात, मुख्य भरावा, पाण्याचा काही भाग आणि तलावापुढील कॅनॉल गेलेला १५ किमीचा भाग सांगली जिल्ह्यात . आणि बहुतांश पाणी जाते सोलापूर जिल्ह्यातील क्षेत्राला अशी स्थिती राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाची १४० वर्षा पासून आहे . या तलावाचे फलटण येथील विभागीय कार्यालयातील व्यवस्थापन सांगली जिल्हा जलसंपदा कडे वर्ग व्हावे . पंढरपूरचे उपविभागीय कार्यालयातील म्हसवड ( राजेवाडी ) तलावा संदर्भातील व्यवस्थापन आटपाडी येथे सुरु करावे .
आणि महुद येथील शाखा कार्यालय तलावाच्या मुख्य ठिकाणी राजेवाडी येथे व्हावे . राजेवाडीतल्या म्हसवड तलावाचे, १४० वर्षानंतर तरी नामकरण राजेवाडी तलाव असे केले जावे . या मुख्य मागण्या तातडीने वास्तवात आणाव्यात . राजेवाडी तलावाचे पाणी आटपाडी तालुक्याला दिले जावे म्हणून या तलावाच्या सांडव्याची काही दशकापूर्वी उंची वाढविली गेली . तरीही संपूर्ण आटपाडी तालुका राजेवाडीच्या पाण्यापासुन वंचितच ठेवला गेला.
आटपाडी तालुक्याकडे जाणाऱ्या नव्या कॅनॉल निर्मितीचा फार्सही सुमारे ४० वर्षापूर्वी केला गेला . तथापि राजेवाडी तलावाचे पाणी संपूर्ण आटपाडी तालुक्याला दिले गेले नाही . हे जळजळीत वास्तव आहे . राजेवाडी तलावा संदर्भातल्या आटपाडी तालुक्याच्या मुख्य मागण्यासह, आटपाडी ( सांगली ) तालुक्याच्या पश्चिम भागातले सर्व तलाव, तलाव जोड प्रकल्पाद्वारे जोडत, राजेवाडी तलावाच्या नव्या कालव्याद्वारे हे पाणी आटपाडी तालुक्यात सर्वत्र फिरविले जावे. आणि शेवटी सांगोला तालुक्यात अन्यत्र न्यावे तसेच बुध्दीहाळ तलावातही ( सांगोला ) सोडले जावे .
माण तालुक्यातील शेतकऱ्यांना राजेवाडी तलावाच्या पाण्याचा लाभ यापुढेही चालुच ठेवावा . उरमोडीचे पाणी किंवा कारखेल पासून जाणाऱ्या निरेच्या पाण्याने राजेवाडी तलाव बारमाही प्रवाहीत केला जावा. या तलावातल्या, निम्म्याने साचलेल्या गाळाने, हजारो एकर पडीक जमीन सुपीक बनविली जावी . या तलावाची पाणी साठवण क्षमता पूर्ववत ३ टीएमसी पर्यत न्यावी .
आटपाडी तालुक्यातील उन्हाची घनता राजस्थानच्या जैसलमेर सारखी असल्याचे लक्षात घेवून, राजेवाडी तलावाचे पाणलोट क्षेत्र, आटपाडी तालुक्यातील विविध तलाव, त्यांचे कॅनाल, या परिसरामधून प्रचंड सौर उर्जा निर्मिती व्हावी, आटपाडी तालुक्यातील प्रचंड डोंगर रांगावर पवन चक्यांच्या माध्यमातून वीजनिर्मिती करून राजेवाडीचे सर्व नवसुधारणांचे सोपस्कर पार पाडले जावे . या आटपाडी तालुक्याच्या हिताला मोठा न्याय देणार्या महत्वाच्या मागण्या आहेत . या मागण्यासाठी आपण सातत्याने सरकारचे लक्ष वेधल्याचे सादिक खाटीक यांनी प्रारंभीच स्पष्ट केले .
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्याच्या हिताच्या मागण्या संदर्भात, राज्यातील ४ खासदार, ८ आमदार महोदयांनी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहली आहेत . त्यामध्ये सर्वश्री आ . सुहासभैय्या बाबर खानापुर, आ . गोपीचंद पडळकर जत , आ . रोहितदादा सुमन आर आर आबा पाटील तासगांव – कवठेमहंकाळ , आ . विश्वजीत कदम पलुस – कडेगांव, खासदार विशालदादा पाटील सांगली, खा . अमोल कोल्हे शिरूर, खा . अमर काळे वर्धा, खा . फौजिया खान परभणी, आमदार उत्तमराव जानकर माळशिरस , आ . बापूसाहेब पठारे वडगांव शेरी पुणे, आ. जयंत आसगांवकर कोल्हापूर, आ . अभिजित पाटील माढा,
या लोकप्रतिनिधींच्या सह , पाणी संघर्ष समितीचे प्रणेते डॉ . भारत पाटणकर कासेगांव, एबीपी माझा मराठी न्युज चॅनेल मुंबईचे मुख्य संपादक, आटपाडीचे सुपुत्र राजीव खांडेकर मुंबई या मान्यवरांचा समावेश आहे . याशिवाय राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने, आटपाडीच्या मागण्यां समर्थनार्थ राज्यातील अन्य काही लोकप्रतिनिधींनीही राज्य शासनाचे लक्ष वेधल्याचे समजते . राजेवाडी गावच्या ग्रामपंचायतीने या मागण्यांसाठी मासीक सभेत, ग्रामसभेत केलेल्या ठरावांच्या प्रती शासनाला पाठविल्या आहेत .
आटपाडी तालुका वाशीयांच्या हिताच्या मागणीला वास्तवात येऊ न देण्याच्या उद्देशानेच म्हसवड ( राजेवाडी ) तलावाच्या व्यवस्थापनाच्या, सातारा, गोंदावले, म्हसवड येथील नव्या कार्यालया संदर्भातला नवा प्रस्ताव केल्याचे आणि हाच प्रस्ताव सत्यात आणण्यासाठी, हे सातारा जिल्हा वाशीय नेते प्रयत्नरत असल्याची चर्चा आहे .
राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्याच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या मागण्या सत्यात येण्या संदर्भाने सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीं सह राज्यातील लोकप्रतिनिधीनी विधीमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी आवाज उठवावा आणि राज्यातल्या संसद सदस्यांनी आटपाडी तालुक्याच्या न्याय मागण्याच्या समर्थनार्थ राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खास पत्रे लिहावीत, असे प्रसार माध्यमातून आग्रही आवाहनही सादिक खाटीक यांनी केले आहे .


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती