राजेवाडीतला ” म्हसवड तलाव ” आटपाडीचाच व्हावा – सादिक खाटीक

शासनासह लोकप्रतिनिधींना साकडे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडीतला “म्हसवड तलाव” १४० वर्षानंतर तरी आटपाडीचाच केला जावा . असे आर्जवी साकडे आटपाडीचे ज्येष्ट पत्रकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी राज्यातला अनेक मान्यवरांना घातले आहे .

राजेवाडी तलावाच्या अनुषंगाने आटपाडी तालुक्यावर होत असलेल्या प्रचंड अन्यायावर न्याय मिळावा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते खा . शरदचंद्रजी पवार, माजी राज्यपाल राम नाईक, माजी मंत्री आ . जयंतराव पाटील, खा . सुप्रियाताई सुळे, खा . फौजिया खान, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांच्यासह संसद आणि विधीमंडळातील अनेक लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे साकडे घालणारे खास निवेदन सादिक खाटीक यांनी पाठविले आहे .

सांगली जिल्ह्यातील आटपाडी शहराच्या वायव्य दिशेला ३० किमी अंतरावर राजेवाडी गावालगत ३ टीएमसी इतक्या क्षमतेचा भला मोठा तलाव आहे . तर आटपाडी शहराच्या आग्नेय दिशेला ३० किमी अंतरावर बुद्धीहाळ तलाव हा ही एक भला मोठा तलाव आहे . साधारणतः १८७६ ते १८७९ च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या राजेवाडी या तलावात सध्या प्रचंड गाळ साठल्याने याच्या पाणी क्षमतेवर मोठा प्रतिकुल परिणाम झालेला आहे .

जवळ जवळ दीड टीएमसी पाण्याच्या क्षमतेची जागा गाळाने व्यापली आहे . या तलावाच्या अनुषंगाने, आटपाडी तालुक्याचे दुर्देव असे की, या तलावाचा मुख्य भरावा आटपाडी तालुक्यात जरी असला तरी गत १४० वर्षा पासून आटपाडी तालुक्यावरच, या तलावाच्या माध्यमातून मोठा अन्याय झाल्याचे सर्वांच्या लक्षात येईल . १९६३ च्या दरम्यान राजेवाडी तलावाच्या सांडव्याची उंची एक फुटाने वाढविल्याने या तलावाची थोडी फार पाणी क्षमता वाढली आहे . तरीही गाळाने राजेवाडीचे पाणी जवळपास निम्मानेच कमी झाले आहे . १८८० ते १९३२ पर्यत म्हणजे जवळ जवळ ५२ वर्षे राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाने पंढरपूर शहराला पिण्याचे पाणी पुरविले आहे .

पंढरपूरच्या पदमावती तलावात जाणारे राजेवाडीचे हे पाणी गोपाळपूर पर्यंत जात होते . भाटघर धरणाचे पाणी पंढरपुरात आल्यानंतर राजेवाडीचे पंढरपूरकडे जाणारे पाणी बंद करण्यात आले. त्याच न्यायाने, सांगोला तालुक्याला विविध पाणी योजनातून पाणी मिळू लागले आहे . आणखी काहीं योजनांचे पाणी भविष्यात त्यांना मिळणार आहे .

त्या पार्श्वभूमी वर राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाचे बहुतांश पाणी, आता आटपाडी तालुक्यातच सर्वत्र फिरविणे न्यायाचे होणार आहे. याकडे लक्ष वेधून सादिक खाटीक यांनी, १ ) सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या राजेवाडी गावा लगतच्या या मोठ्या तलावाचे नाव शासन दरबारी आजही ” म्हसवड ” तलाव असेच आहे . वास्तवीक म्हसवड हे राजेवाडी गावापासून २० किमी इतके लांब, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातले गाव आहे . मात्र आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावा लगतच्या या तलावाचे नाव म्हसवड तलाव आहे, ते तात्काळ बदलून राजेवाडी तलाव असे शासन दप्तरी नामकरण झाले पाहिजे. ही आमची पहिली प्रमुख मागणी आहे .

२ ) राजेवाडीतल्या या म्हसवड तलावाचे शासकीय व्यवस्थापन आटपाडी शहरापासून १०० किमी वरील सातारा जिल्ह्यातील फलटण येथे आहे . कार्यकारी अभियंता निरा उजवा कालवा विभाग फलटण यांच्या माध्यमातून यावर व्यवस्थापन केले जात आहे . या म्हसवड ( राजेवाडी ) तलावाचा उपविभाग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे आहे, तर शाखा कार्यालय सोलापूर जिल्ह्याच्याच सांगोला तालुक्यातील महुद येथे आहे . फलटण येथील म्हसवड तलावाचे व्यवस्थापन तातडीने बदलून याचे शासकीय व्यवस्थापन सांगली पाटबंधारे मंडळ यांच्याकडे वर्ग केले जावे . या तलावाच्या उपविभागाचा कारभार आटपाडीतून सुरु केला जावा आणि शाखा कार्यालय राजेवाडी येथे सुरू केले गेले पाहिजे .

अशी आमची दुसरी न्याय मागणी आहे . ३ ) आटपाडी तालुक्यातील या तलावाचे बहुतांश पाणी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अनेक गावांना जाते आहे . आटपाडी तालुक्यातील नाममात्र क्षेत्राला याचा उपयोग होतो आहे . वास्तवीक सांगोला तालुक्यात अनेक योजनांचे पाणी आले आहे . हे लक्षात घेऊन राजेवाडी तलावाचे बहुतांश पाणी आटपाडी तालुक्यालाच दिले गेले पाहीजे .

४ ) आटपाडी शहराच्या, तालुक्याच्या पश्चिमेला, नैरुत्य ते वायव्य या दरम्यानच्या दिशेला अनेक तलावांची ( १० पेक्षा जास्त ) शृंखला आहे . राजेवाडी तलावाच्या नव्या कॅनॉलच्या माध्यमातून राजेवाडी तलावाचे बहुंताश पाणी आटपाडी तालुक्यातील सर्व तलावांना कॅनालने जोडत तलाव जोड योजनेतून सर्व तालुकाभर फिरवत नंतर ते पाणी सांगोला तालुक्यातल्या बुद्धीहाळ तलावाकडे नेले पाहिजे . ५ ) राजेवाडी तलावातला गाळ काढून आटपाडी तालुक्यातील शासकीय अथवा खाजगी पडीक, मुरमाड जमिनीवर ओतला पाहीजे. ज्या योगे शेतीलायक नवीन क्षेत्र तयार होवू शकेल .

६ ) म्हसवड जवळच्या कारखेल जवळून गेलेल्या नीरा उजव्या कॅनालचे पाणी राजेवाडी तलावात सायपनने येवू शकते . राजेवाडीचे पाणी आटपाडी तालुक्यातल्या इतर तलावांमध्ये सायपनने जावू शकते . नीरा धरणाच्या नीरा कालव्यातून राजेवाडी तलाव बारमाही प्रवाहीत ठेवण्यासाठी नीरेचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे . याशिवाय गतवर्षी उरमोडीचे पाणी राजेवाडीत आणले गेले होते . हा राजेवाडी तलाव सतत प्रवाही रहावा यासाठी शासनाने उरमोडी अथवा नीरेच्या पाण्यातून राजेवाडी तलावासाठी खास तरतुद केली पाहीजे .

७ ) राजस्थानच्या जैसेलमेर इतकी उष्णतेची घनता आटपाडी तालुक्यातील उन्हाची आहे . हे लक्षात घेऊन राजेवाडी तलाव ते बुध्दीहाळ तलाव या दरम्यान येणाऱ्या आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेकडील सर्व तलावाचे खुली पात्रे त्यांचे कॅनॉल, प्रचंड सौर उर्जा निर्मितीसाठी, सौर उर्जेचा प्रचंड प्रकल्प आटपाडी तालुक्यात राबविला गेला पाहीजे .

या सौर उर्जा प्रकल्पातून प्रचंड वीज मिळेल . शिवाय सर्वच तलावांच्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबून, पाणी साठ्याची मोठी हानी टळेल. आटपाडी तालुक्याच्या पश्चिमेला प्रचंड मोठया व प्रचंड लांब अंतराच्या डोंगर रांगा आहेत . यावर पवन उर्जा प्राप्तीसाठी पवनचक्क्या उभारल्यास यातून मिळणाऱ्या विजेच्या उत्पनातून व सौर उर्जेच्या उत्पनातून राजेवाडी ते बुद्धीहाळ तलावापर्यतच्या तलाव जोड प्रकल्पासाठी लागणारा खर्च, सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीसाठीचा होणारा खर्च आणि राजेवाडी तलावाचा गाळ काढणे, अन्यत्र टाकणे, यासाठीचा सर्व खर्च या सौर उर्जा, पवन उर्जा निर्मितीतून निघू शकतो, आणि काही वर्षात हे खर्चाचे पैसे निघाल्यानंतर हे सौर, पवन उर्जेचे प्रकल्प प्रचंड नफ्याचे उत्पन्न दिल्याशिवाय राहणार नाहीत .

या सर्व बाबी लक्षात घेऊन आटपाडी तालुक्याच्या राजेवाडीतल्या म्हसवड तलावाच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यावर शतकापासून होत असलेल्या अन्यायावर राज्याच्या शासनाच्या माध्यमातून न्याय द्यावा . अशी मागणी शासनकर्त्यांकडे करून सादिक खाटीक यांनी अन्य लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री महोदयांना खास पत्र लिहून राजेवाडीच्या संदर्भाने आटपाडी तालुक्याला न्याय मिळवून द्यावा . असे आर्जवी आवाहन केले आहे .