प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी
आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी येथे आनंदा बिरा लेंगरे यांच्या बंद घराचा दरवाजा उघडून सुमारे दोन लाख ६८ हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी त्यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.
आटपाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ३ मे रोजी रात्री अडीच ते सव्वातीन वाजण्याच्या दरम्यान लेंगरेवाडी येथील आनंद लेंगरे यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजा अज्ञात चोरट्यांनी उघडून १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, दहा ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, बारा ग्रॅम सोन्याची वजरटीक, 500 ग्रॅम चांदीचा करदोडा, 120 ग्रॅम चांदीची जोडवी, 330 ग्रॅम चांदीची इरुदया, मासोळ्या, पैंजण, हातातील दोन कडे,पाच ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, लहान मुलाच्या दोन अंगठ्या, गळ्यामध्ये घालण्याच्या सोन्याच्या दोन पेट्या, दोन पानाड्या,६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे चार बदाम तसेच बेडरूममधील कपाटात ठेवलेली ८० हजार रुपये रोख रक्कम असा दोन लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.घटनास्थळी तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व आटपाडीचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी भेट दिली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या
मटण खायला घालत नाही म्हणून मुलाने केला बापाचा खून
कॅम्पमध्ये गुन्हेगाराचा खून
पिलीव गावात एकाच रात्री चार घरफोड्या