पाटण पंढरपूर राज्य मार्गावर धोकादायकरित्या पार्क केलेल्या कंटेनरमुळे अपघाताची शक्यता

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
उंब्रज

कळंत्रेवाडी,ता.कराड गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गावर धोकादायकरित्या पार्क केलेल्या कंटेनरमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती नुसार,गत दोन ते तीन दिवसांपासून या ठिकाणी पाटण पंढरपूर राज्य मार्गाला लागूनच अतिशय धोकादायकरित्या एक कंटेनर उभा असल्याचे आढळून येत आहे. दरम्यान, पाटण पंढरपूर राज्य मार्गावरून चिपळूण मार्गे पुढे कोकण विभागाकडे मोठ्या प्रमाणात पर्यटक तसेच मालाची वाहतूक रात्रंदिवस सुरू असते. त्यामुळे हा मार्ग सतत गजबजलेला असतो. दरम्यान, सदरचा कंटेनर हा राज्यमार्गाला खेटूनच उभा असून त्याच्या पार्किंग लाइट्स बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळेस दुचाकी अथवा चार चाकी वाहन कंटेनरवर आढळून गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडून जीवित हानी झाल्यास त्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत असून अत्यंत बेजबाबदारपणे पार्क केलेल्या कंटेनर संदर्भात संबंधितांच्यावरती उंब्रज पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रवासी करीत आहेत.