आटपाडी/ प्रतिनिधी:
सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करण्याची मागणी आटपाडी तालुका वंचित बहुजन आघाडीच्यावतीने तहसिलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तालुकाध्यक्ष साहेबराव चंदनशिवे,राखीताई खरात,रविकांत सोहनी,आबासो काटे,शैलेंद्र ऐवळे,भिकाजी खरात,कुमार सावंत,मनिषा सावंत,महेश ऐवळे,दयानंद ऐवळे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण,तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव सरगर,अजित कटरे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
25 मार्चपासून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे.ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट इत्यादिमुळे लोकांचा आपआपसांतील संपर्क कमी होईल अशा प्रकारे सर्व व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले.या चार महिन्यातील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर कोरोनाच्या प्रसाराचा पॅटर्न लक्षात घेऊन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. गरीब व हातावर पोट असलेल्या बहुसंख्य लोकसंख्येचा रोजगार व एकूणच उद्योग व्यवसाय व अर्थ व्यवहार तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्याची प्रतिकारक्षमता अंदाजे 80 % लोकांनी दाखवली आहे.15% लोक वैद्यकीय उपचाराला प्रतिसाद देऊन कोरोनाचा मुकाबला करण्यात यशस्वी झाले आहेत. 5% लोक vulnerable आहेत. हे अद्ययावत वैद्यकीय उपचार देऊनही ही नियंत्रणात आणता येत नाहीत. वैद्यकीयदृष्ट्या गंभीर होत आहेत वा बळी पडत आहेत.
सरकारने या 15 % व 5 % अशा एकूण 20% लोकांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सर्व प्रयत्न केंद्रित केले पाहिजेत व कोरोना नियंत्रणाच्या नियोजनाचे हे सूत्र ठेवले पाहिजे.
100% लोकसंख्येवर निर्बंध घालण्याचे आर्थिक दुष्परिणाम समोर आले आहेत. अर्थव्यवस्था संकटात आहे. 80% पेक्षा अधिक लोकसंख्येला बेरोजगारी व उपासमारीचा सामना करावा लागतो आहे. गेल्या चार महिन्यांचा आढावा घेऊन सरकारने काही निर्णय तातडीने घेतले पाहिजेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच केलेली आहे.
कोरोना रोखण्यासाठी जे आरोग्य विषयक सुरक्षिततेचे नियम आहेत, त्याचे काटकोर पालन करत सर्व व्यवहार चालू करावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
एसटी, बेस्ट व सर्व शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सरकारने त्वरित सुरु कराव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. गणपती उत्सवासाठी खाजगी बस वाहतूकीचे बुकींग सुरुवात झाले आहे. खाजगी सेवा चालू होत असतील तर सरकारने वाहतूक सेवा सुरू करण्यात काय अडचण आहे ? सरकारने एसटी व बेस्टच्या सेवा तुरळक प्रमाणात सुरू केल्या आहेत. परंतु त्या फारच अपुऱ्या आहेत. सार्वजनिक वाहतूक सेवेअभावी लोकांची अतिशय गैरसोय होत आहे.
दुसरे म्हणजे सध्या घातलेली जिल्हा बंदीही ताबडतोब उठवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन