मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला कंटेनरची धडक

पती जागीच ठार ;पत्नी गंभीर जखमी: जत शहरातील घटना
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत

मॉर्निंग वॉकला गेलेल्या दांपत्याला भरधाव कंटेनरने उडवल्यामुळे पती जागीच ठार झाला. तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. जत शहरातील जत-विजापूर रस्त्यावर डॉ. तांबोळी यांच्या हॉस्पिटलसमोर भीषण घटना घडली आहे. सतीश गेनाप्पा शिंदे,( वय ३२) रा. सातारा रोड, जत असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर त्याची पत्नी गंभीरित्या जखमी झाली आहे. गुरुवार दि. 27 एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गाने अनेकांचे बळी घेतले आहेत. महामार्गावर कोठेही फलक लावले नसून जर शहरातील दुभाजकाचा प्रश्न अद्याप सोडविला नाही. अनेक ठिकाणी रस्त्यावर अर्धवट कामे आहेत त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. जत शहरातून जाणाऱ्या वाहनावर वेग-मर्यादा लावण्यात आली नसल्यामुळे अनेक वाहने अत्यंत बेदरकार व भारघावपणे चालविली जातात. त्यामुळे अनेकांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज गुरुवार सकाळी साडेपाचच्या सुमारास सतीश शिंदे व त्याची पत्नी हे विजापूर रोड वरून मॉर्निंग वॉकसाठी गेले होते‌ परत येत असताना अगदी रस्त्याच्या कडेने चालत जाणाऱ्या या दांपत्याला विजापूर होऊन साताऱ्याकडे निघालेल्या भरघाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या दोघांनाही रस्त्यावरून अनेक फूट फरपटत पुढे नेले. कंटेनरची जोराची धडक बसल्यामुळे सतीश हा जागीच ठार झाला. तर त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना मदत केली. सतीश हा सातारा रोड येथे राहतो. शरद पवार हॉस्पिटलच्या समोरच्या बाजूला त्याचे आशीर्वाद ड्रायक्लीनर्स नावाचे इस्त्री व ड्रायक्लीनचे दुकान आहे. अत्यंत सुसभावी व कष्टाळू असलेल्या सतीशचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे . गुरुवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.