भाजपा नेते जयवंतराव सरगर यांना बंधुशोक !

प्रा.दशरथ सरगर यांचे निधन
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

निंबवडे (अनुसेवाडी) येथील भारतीय जनता पार्टीचे नेते जयवंतराव सरगर यांचे बंधू व आटपाडी पंचायत समितीच्या सभापती सौ.पुष्पाताई सरगर यांचे दिर प्रा. दशरथ राजाराम सरगर यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
प्रा.दशरथ सरगर हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे,मितभाषी,अप्रतिम बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण करुन आटपाडी thi येथील आटपाडी कॉलेज (श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय) पदार्थविज्ञानशास्त्र विभागात पदवी शिक्षण पूर्ण केले. तदनंतर त्यांनी तत्कालीन परिस्थितीत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शिवाजी विद्यापीठात पदव्युत्तर एम. एस्सी. हे शिक्षण पूर्ण करून अध्यापन शास्त्राची पदवी प्राप्त केली.उच्च बौद्धिक क्षमता असतानाही समाजामध्ये शैक्षणिक सेवा करण्याचा विडा उचलला. त्यांनी मुंबई येथे भौतिकशास्त्र/पदार्थविज्ञान विषयाचे ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कामकाज केले.
गेल्या काही दिवसांपासून अचानकपणे त्यांना कॅन्सरसदृश्य आजाराचा प्रादुर्भाव झाला. त्यावर त्यांचे नियमितपणे उपचार सुरू होते. भाजपा नेते जयवंतराव सरगर यांनी त्यांना या आजारामधून ठिकठाकपणे बरे होण्यासाठी अनेक ठिकाणी वैद्यकशास्त्रातील शर्तीचे प्रयत्न व उपाय केले. आटपाडी येथे उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
एका सच्चा, हाडाच्या वैज्ञानिक शिक्षकाचा, समाजकार्यात अग्रेसर असलेल्या एका समाजसेवकाचा व समवयस्कात असलेल्या एका दिलदार मित्राच्या निधनाने शैक्षणिक,सामाजिक क्षेत्रात व मित्र परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज निंबवडे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवार दि.९ रोजी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.