विस्ताराधिकारी खरात यांच्या बदली मागणीचा तुम्हाला का राग येतोय?

राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष अमोल शिंदेे यांचा सवाल
संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी के.व्ही.खरात यांच्या बदलीसंदर्भात राष्ट्रवादी युवकचे तालुका उपाध्यक्ष अमोल शिंदे यांनी नुकतीच गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी केली होती.त्यासंबंधित पंचायत समितीकडे अर्ज दाखल केल्यानंतर त्याचवेळेला खरात हे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचा अविर्भाव काही लोकांमध्ये निर्माण झाला आहे असे मत अमोल शिंदे यांनी मांडले.
ते म्हणाले, ज्या वेळेला मांडवे गावच्या गायरानाचा लिलाव केला जात होता, त्या संदर्भात गावकऱ्यांनी वारंवार तक्रारी केल्या, त्यावेळेला खरात यांचा कर्तव्यदक्षपणा कुठे गेला होता? स्वच्छ भारत मिशन राबवले, कित्येकजणांच्या जुन्या शौचालयावर बिले काढून त्यामध्ये किती टक्केवारी खालली याची जाणीव संपूर्ण जनतेबरोबर तुम्हालाही आहेच. गिरवीच्या प्रधानमंत्री आवास योजना ड यादीमध्ये मयत वडील असताना देखील व आपण स्वतः अधिकारी आहोत याची जाणीव असताना देखील कसं काय घरकुलाचा लाभासाठी प्रयत्न केला जातोय? त्यावेळी कुठे गेला होता कर्तव्यदक्षपणा? रेडे गाववाल्यांनी का तक्रारी केल्या? धर्मपुरीत काय झालं? यापुढे प्रत्येक गावातले तरुण त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत बोलणार आहेत. त्यामुळे तुम्हाला का राग येतोय?कोणते अधिकारी कर्तव्यदक्ष आणि कोणते अधिकारी नाहीत याची जाणीव आम्हाला आहे असेही शिंदे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, परिवर्तन पॅनलच्या विरोधात ज्यांना कोणाला तक्रार करून ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ पाहायचं असेल तर होऊन जाऊ द्या गेल्या दहा वर्षातल्या सर्वच कामांची चौकशी! गेल्या दोन वर्षात गावांमध्ये बनत असलेल्या चांगल्या रस्त्यांमुळे आणि आपली सत्ता गेल्यामुळे आपला काळाबाजार ज्या अधिकाऱ्याने लपवून ठेवला तो अधिकारी अडचणीत आल्यानंतर आपण अडचणीत येऊ याची कल्पना आहे. त्यामुळे ते के.व्ही.खरात यांची पाठराखण करत आहेत. परंतु वाईट कामाचे फळ हे वाईटच मिळते याची जाणीव सर्वांना आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले.