‘यासाठी झगडताहेत जेष्ठ नागरिक’

वाळवा तालुक्यात ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान संघटनेचा मेळावा संपन्न
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/वाळवा :
अर्थक्रांती व राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंचच्या ज्येष्ठ नागरिक जीवन गौरव अभियान संघटनेचा मेळावा अहिरवाडी (ता.वाळवा) येथे संपन्न झाला.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कदम (चेअरमन पाणीपुरवठा संस्था आहेरवाडी) होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील, जिल्हा सचिव गजानन पाटील, उपाध्यक्ष नारायण सावंत, जिल्हा सल्लागार किरण पाटील उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी गायलेल्या साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या सर्वधर्मीय प्रार्थनेने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिलेला असून तो मान्य करून घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची स्वतंत्र वोट बँक तयार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उपाध्यक्ष नारायण सावंत यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांचे सध्याचे हलाखीचे जीवन किती खडतर आहे, त्यांना कोणकोणत्या अडचणीतून जीवन जगावे लागत आहे याचे वास्तव अँड. किरण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
जिल्हा सचिव गजानन पाटील यांनी केंद्र सरकारकडे सादर केलेल्या प्रस्तावाचे विश्लेषण केले.
१) ६० वर्षावरील प्रत्येक भारतीय स्त्री पुरुष मग तो शेतकरी असो, मजूर, व्यापारी, उद्योजक, व्यवसायिक यांना जात धर्म प्रांत भाषा याचा भेदभाव न करता दरमहा महागाई भत्त्याच्या जोडलेले रुपये दहा हजार सन्मानधन केंद्र सरकारकडून मिळाले पाहिजे,
२) ज्येष्ठ नागरिकांना प्रतिष्ठेचे जीवन लाभण्यासाठी निर्णय घेणारे स्वतंत्र मंत्रालय, कॅबिनेट मंत्री आणि या खात्यास बजेट व्यवस्था केंद्र सरकारने करावी,
३) संरक्षण, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था, वाचनालय, फूटपाथ, बगीच्या, क्रीडांगणे इत्यादी नागरी सुविधा विशेष श्रेणी च्या स्वरूपात उपलब्ध करून द्याव्यात,
४) ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाच्या संरक्षणासाठी ॲट्रॉसिटी कायद्याच्या धरतीवर विशेष आचार संहिता बनवली जावी.अशा प्रकारच्या मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे हा प्रस्ताव मान्य झाल्यास ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होईल, शहराकडे जाण्याचा ओघ कमी होईल, मार्केटमधील क्रयशक्ती वाढेल, ग्रामीण भागातील शेतकऱ्याला सुखासमाधानाचे दिवस येतील असे स्पष्टीकरण दिले.

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा दहा हजार रुपये सन्मान धनाची का गरज आहे हे विविध उदाहरणे देऊन अध्यक्ष मोरे पाटील यांनी पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी कदम, माजी पोलीस पाटील बाजीराव पाटील, माजी सरपंच राहुल कदम, पोलीस पाटील नितीन कदम, संघटनेचे वाळवा तालुका सचिव आर. एन. मोहिते आणि गावातील सुमारे सत्तर ते ऐंशी जेष्ठ नागरिक कार्यक्रमास हजर होते. कार्यक्रमातील अनेक नागरिकांनी आपली विविध मते मांडली. मोरे पाटील यांनी नागरिकांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
स्थानिक कार्यकर्ते शरद पवार यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. अशाप्रकारे अतिशय रेखीव स्वरूपात सदरचा मेळावा संपन्न झाला.
संघटनेचा पुढील मेळावा औदुंबर ता. पलूस येथे शनिवार दिनांक 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचे निश्चित ठरले. या व यापुढील संघटनेच्या प्रत्येक मेळाव्यास बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांना हजर ठेवण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले.
कार्यक्रमासाठी वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव तालुक्यातून अनेक ज्येष्ठ नागरिक आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारकडे सादर केलेला प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत मान्य करून घ्यायचाच, त्यासाठी कितीही कष्ट पडले तरी चालतील अशाप्रकारचा निर्धार मेळाव्यातील उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केला आणि या प्रस्तावासाठी जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला.