अर्थक्रांती जेष्ठ नागरिक संघटनेचे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी : मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तत्परतेने सोडविणे, विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविणे, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्याने जाहीर झालेल्या वयोश्री सारख्या योजनेचे अधिकाधिक लाभार्थी ज्येष्ठ नागरिक होण्याच्या दृष्टीने अर्थक्रांती राष्ट्रीय आर्थिक साक्षरता मंच अंगीकृत जेष्ठ नागरिक जीवनगौरव अभियानचे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.
दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांचेसाठी केंद्र सरकार व सांगली जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या वयोश्री योजनेची अंमलबजावणी गाव पातळीवर प्रभावीपणे राबविणे, ज्येष्ठांच्या विविध समस्या संदर्भात संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी यांची गुरुवार दिनांक सहा जानेवारी रोजी भेट घेतली, वेळी ते बोलत होते.
यावेळी वयोश्री योजनेचे लाभार्थी शोधणे, विविध शासकीय योजनांची ग्रामपंचायतीच्या वार्ता फलकावर प्रसिद्धी देणे, नागरिक संघटनेस केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती देणे, अशा योजनांची वृत्तपत्र, आकाशवाणी, व्हाट्सअप आणि अन्य प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्धी देणे इत्यादी विषयासंदर्भात चर्चा झाली. चर्चा खूपच सकारात्मक आणि संघटना पदाधिकाऱ्यांमध्ये ऊर्जा उत्पन्न करणारी झाली.
संघटनेच्या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे पाटील, जिल्हा सचिव गजानन पाटील, उपाध्यक्ष नारायण सावंत, संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. किरण पाटील, वाळवा तालुका अध्यक्ष भुपाल साळुंखे, सुबराव पाटील, पलुस तालुका अध्यक्ष सुभाष शिंदे, रघुराज मेटकरी इत्यादी कार्यकर्ते होते.