
आता एकच निर्धार… मंत्रालयाच्या दारात थाटू आपला संसार!
ऐन दिवाळीत एसटी आंदोलकांचा प्रशासनाच्या नावाने शिमगा!
आत्महत्या करण्यापेक्षा लढून मरणार!:आंदोलकांचा निर्धार!

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी :
‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरण करावे’ या एकमेव मागणीसाठी आटपाडी तालुक्यातून एसटी कामगारांच्या आंदोलनाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्रभर याचा वनवा पेटत आहे.गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनात प्रशासनाने कुरघोडी केल्यानंतर आंदोलकांचा आक्रोश आणि उद्रेक होत आहे. ३५ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर तरी सरकार जागे होणार का? असा प्रश्न करून ‘आत्महत्या करून मरण्यापेक्षा लढून मरण्याचा निर्धार’ आंदोलकांनी निश्चित केला आहे. ‘विलीनीकरण नाहीतर मरण!’ एवढ्यावरच आंदोलक ठाम आहेत. शासन मात्र गेंड्याची कातडी पांघरून आत्तापर्यंत चर्चेस उतरले नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे. ऐन दिवाळीत प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे आंदोलकांनी निष्ठुर प्रशासनाच्या नावाने शिमगा सुरू केला आहे.येत्या १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या प्रांगणात एसटी कर्मचारी मुलाबाळांसह उघड्यावर संसार मांडणार असून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा व लढाई जिंकल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना अतिशय तुटपुंज्या पगारावर जोखमीच्या कर्तव्याची सेवा बजावावी लागते.मिळणाऱ्या पगारावर त्यांना गाडी चालवताना कराव्या लागणाऱ्या कसरतीप्रमाणेच संसाराचा गाडा चालवतानाही त्याहीपेक्षा मोठी कसरत करावी लागते.अशा परिस्थितीत त्यांचे पगारही वेळेवर होत नाहीत.त्यामुळे सदैव आर्थिक नैराश्याला सामोरे जावे लागत असतानाच काहीजणांनी खचलेल्या परिस्थितीमुळे आत्महत्या करून जीवन संपवले. अशा ३२ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येनंतर एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याचा लढा उभारण्यात आला. याबाबत शासनाला कल्पना देऊनही कार्यवाही न झाल्यामुळे आंदोलनाचा मार्ग पत्करण्याची वेळ आली. आटपाडी हे या आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले आहे.
आटपाडी आगारातील २७१ कामगारांपैकी जवळपास २६२ पेक्षा अधिक कामगारांनी आपल्या वेगवेगळ्या संघटनांचा राजीनामा देऊन संघटनाविरहित कामगारांचा एसटी विलीनीकरणाचा लढा उभा केला.आटपाडी येथे आंदोलनास सुरुवात केली.लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना ते मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली.डेपोतून बस गाड्या बाहेर काढण्यासाठी चंग बांधला असतानाच कर्मचाऱ्यांंनीही आपल्या आंदोलनाची धार वाढवली. निषेध,घोषणाबाजी करीत मोठ्या विरोधाने सामना केला. परंतु सामंजस्यही दाखवीत आरटीओ पासिंगसाठी रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चार गाड्या शांततेत बाहेर काढू दिल्या. मात्र त्यानंतर प्रशासनाने सोमवारी पुन्हा इतर आगारातील कामगारांच्या मदतीने गाड्या डेपोतून बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे जाणवल्यानंतर आंदोलकांनी टोकाची भूमिका घेतली. गळफास घेऊन सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही घटना आटोक्यात आली. संतप्त आंदोलकांनी घोषणाबाजी करीत व शासनाचा निषेध करीत गाड्या बाहेर काढण्याला कडाडून विरोध केला.
आटपाडी तालुक्याचे युवानेते अनिलशेठ पाटील यांच्या भक्कम मध्यस्थीनंतर आंदोलक शांत झाले. यावेळी एका आंदोलक भगिनीने नेतृत्व करून बाहेरून आलेले कर्मचारी डेपोतून बाहेर घालवल्याशिवाय आम्ही सर्वजण शांत बसणार नाही,असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी कर्मचाऱ्यांनीही मोठा आक्रोश केला.आंदोलकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहिल्यानंतर या कर्मचाऱ्यांना डेपोमधून सुखरूप बाहेर काढून परत पाठवण्यात आले व प्रशासनाचा गाड्या बाहेर काढण्याचा डाव आंदोलकांनी उधळून टाकला.
कष्ट करून खाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवाची परवा न करणाऱ्या शासनाचा धिक्कार करीत आंदोलकांनी हे आंदोलन आज नवव्या दिवशीही सुरूच ठेवले आहे. शासन पातळीवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी आमदार गोपीचंद पडळकर यांचे चर्चेचे प्रयत्न सुरू होते.मात्र यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
दरम्यान या आंदोलनाला महाराष्ट्र राज्यातून पाठिंबा मिळत असून आता एकापाठोपाठ एक एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन डेपो बंद ठेवण्याची साखळी सुरू झाली आहे. आज शुक्रवारअखेर महाराष्ट्रातील २४८ डेपो पैकी सुमारे २०० पेक्षा अधिक एसटी डेपो बंद करण्यात आले आहेत.आता संघटनांनीही या आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र व व्यापक होऊ लागले आहे.
आटपाडी येथील आंदोलनाला युवा नेते अनिलशेठ पाटील यांनी पाठिंबा दर्शवून आंदोलकांना सर्वतोपरी मदत करण्याचे व ठामपणे पाठीशी राहण्याचे जाहीर केले आहे.भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुकाध्यक्ष उत्तमराव बालटे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष संजय कबीर व सरचिटणीस नानासाहेब झुरे व पदाधिकारी, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे चेअरमन व शिक्षक नेते यु.टी.जाधव,आटपाडी बार असोसिएशनचे अध्यक्ष चेतन जाधव,उपाध्यक्ष विलासराव देशमुख,सचिव राम इनामदार,राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव सरगर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात,शिवसेना नेते तानाजीराव पाटील,आटपाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.वृषाली पाटील, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी.एम.पाटील सर,ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राक्षे,धनंजय पाटील,जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, माळी समाजाचे नेते बजरंग माळी,तडवळेचे माजी सरपंच दादासाहेब हुबाले,आनंदराव शेंडे सर,विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, रासपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव सरगर, प्रवासी संघटनेचे पाटील सर आदि संघटना व पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
येत्या १० नोव्हेंबरला मंत्रालयाच्या प्रांगणात एसटी कर्मचारी मुलाबाळांसह उघड्यावर संसार मांडणार असून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा व लढाई जिंकल्याशिवाय माघार घेणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक