नियमांची पायमल्ली करून जत शहरात आठवडा बाजार फुल्ल!

अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:

जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात येण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू केले असतानाही जत शहरात मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करीत आठवडा बाजार भरविल्याने कोरोनाच्या तिस-या लाटेला आमंत्रण दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जत शहरासह तालुक्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत चढउतार होताना दिसत आहे. त्यातच जत शहरालगत असलेल्या मळगेवस्ती या ठिकाणी कोरोनाने एकजण दगावल्याने या वस्तीमधील इतर लोकांची कोरोना टेस्ट केली असता या ठिकाणी नव्यानेच २९ जण कोरोना पाॅझीटीव्ह आढळले.
जत नगरपरिषदेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या वस्तीवर जाणारे रस्ते बंद केले होते. परंतु येथीलच एक नगरसेविका असल्याने त्यांनी नगरपरिषदेने बंद केलेला रस्ता खुला केला आहे.
या वस्तीवरील कोरोना पाॅझीटीव्ह रूग्णांना प्रशासनाने होम आयसोलेशन केले असले तरी येथील काही पाॅझीटीव्ह व्यक्ती या जत शहरात फिरताना दिसत आहेत, ही गंभीर बाब आहे.
जत येथील मंगळवारचा आठवडा बाजार होता.जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्वच आठवडा बाजार न भरविण्याचे आदेश प्रशासनाला दिले असताना जतमध्ये आठवडा बाजार भरलाच कसा? मागील आठवड्यात उमदी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी माडग्याळ येथील भरविण्यात आलेला आठवडा बाजार बंद केला होता. तसेच जत पोलीसांनी डफळापुर येथे भरलेला आठवडा बाजार बंद करण्यास सांगितले होते. मग जत येथील आठवडा बाजाराबाबत जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते?
जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांना कोरोनाचे कोणतेही गांभीर्य नाही, हे आज भरलेल्या जत येथील बाजारावरून दिसून येत आहे.
जत शहरासह तालुक्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असताना जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन हे कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडणारांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत.
आज जत बाजारपेठेला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते. सर्वत्र लोकांची गर्दीच गर्दी पहावयास मिळत होती.बाजारात अत्यावश्यक सेवा वगळता इतर अस्थापनाही आज सुरू ठेवल्याने सर्वच दुकानामध्ये बाजारकरूंनी मोठी गर्दी केली होती.
बाजारपेठेत नागरिकांकडून तसेच व्यावसाईक यांच्याकडून कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नव्हते.
बुधवारी बकरी ईद व गुरूवारी महाराष्ट्रीय बेंदूर असल्याने आज मंगळवारी आठवडा बाजार लोकांच्या गर्दीने खचाखच भरला होता. बाजारपेठेत दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. वाहनामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती.रस्त्याचे कडेला दुचाकी व चारचाकी वाहने उभी करून वाहनधारक बाजार करीत होते.परंतु ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हते.त्यांना या गर्दीचे व कोरोनाचे काही गांभीर्य दिसत नव्हते.
बहुतांशी लोकानी तोंडाला मास्क लावले नव्हते. बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा तर पुरता फज्जा उडालेला दिसत होता. जत नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांचे अधिकारी व कर्मचारी हे गायब होते.त्यामुळे आजची ही बाजारातील गर्दी पहाता येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची घंटाच म्हणावी लागणार आहे.