
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून
कुशल व प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध होणार :जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली :
कोरोनाला लढा देण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर प्राधान्याने भर देण्यात येत आहे. अत्यावश्यक साधन सामुग्री उपलब्ध होत असताना कुशल व प्रशिक्षीत मनुष्यबळाची फार मोठी कमतरता या काळात अधोरेखीत होत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत सुरू झालेल्या मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून कुशल व प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध होईल त्याचबरोबर बेरोजगारांना रोजगार व स्वयंरोजगाराचीही संधी उपलब्ध होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाला. या कार्यक्रमात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे ॲनॉटॉमी विभागात प्रशिक्षणात सहभागी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. या ऑनलाईन समारंभात उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मंत्री नवाब मलिक, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, प्रधान सचिव मनिषा वर्मा, आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह सहभागी होते. तर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा कौशल्य विकास चे सहायक आयुक्त जमीर करीम, कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी आयुब तांबोळी, बालरोग तज्ज्ञ डॉ. मिरगुंडे, डॉ. प्रधान उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कौशल्य विकास विभागाने प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेतल्याने वैद्यकीय क्षेत्राला कुशल व प्रशिक्षीत मनुष्यबळाची उपलब्धतता होणार आहे. आरोग्य विभागाला भेडसावत असणाऱ्या कुशल मनुष्यबळाची यामुळे पूर्तता होणार आहे. या प्रशिक्षणांतर्गत आरोग्य विभागा संबंधी 36 प्रकारच्या कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सांगली, मिरज हा वैद्यकीय हब असून या ठिकाणी रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षीत होणाऱ्या उमेदवारांनी आपणास यामुळे शासकीय नोकरी मिळेल ही मानसिकता न ठेवता घेतलेल्या प्रशिक्षणातून आपण कौशल्य प्राप्त उमेदवार होवू. यामुळे खाजगी क्षेत्रातही आपणास प्राधान्य मिळेल. जे चांगल्या प्रकारे हे कोर्स पूर्ण करतील त्यांना चांगल्या प्रकारची संधीही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदरचे प्रशिक्षण घेताना त्यामधील असणारी कौशल्ये आत्मसात करावीत. 240 तासाच्या या प्रशिक्षणात संपूर्ण सहभाग नोंदवावा. प्रशिक्षणादरम्यान केवळ शासकीय मोफत प्रशिक्षण म्हणून याकडे दुर्लक्ष न करता एक रोजगार व स्वयंरोजगाराची संधी म्हणून पाहावे. आपण हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर गरजूनांही या प्रशिक्षणाबाबत आपल्या मार्फत अवगत करावे. या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या सर्व कोर्सेसची माहिती इतरांनाही द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर म्हणाले, कोरोना लढ्यामध्ये वैद्यकीय साधन सामुग्री यांची उपलब्धतता मोठ्या प्रमाणात शासनाकडून झाली. पण ही साधन सामुग्री हाताळणारे प्रशिक्षीत कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात कमतरता भासू लागली. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत होता. पण आता मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षीत व कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. यामुळे आरोग्य यंत्रणा सुरळीत काम करू शकेल.

संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक