आटपाडीत पाणी आणि रस्त्यांच्या कामांना प्राधान्य :सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:


आटपाडी गावामध्ये प्राचीन काळापासून पाच परमेश्वर मंदिरे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहेत.ती पाच मंदिरं म्हणजे सोमेश्वर, नंदेश्वर, कल्लेश्वर, उत्तरेश्वर व परमेश्वर!  

त्यापैकी सोमेश्वर मंदिरामुळे आटपाडी ग्रामपंचायत वार्ड नंबर ३ मध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी सोमेश्वरनगर स्थापन झाले.त्यामुळे बऱ्याच वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन करण्यात आली होती.परंतु काळानुसार सोमेश्वरनगरची लोकसंख्या वाढल्यामुळे विस्तार वाढला.त्यामुळे मोठी नवीन वाढीव पाईपलाईन करणे गरजेचे होते.आतापर्यंत नवीन वाढीव पाईपलाईन न केल्यामुळे येथील जुन्या वास्तव्यास असलेल्या नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नव्हते. तसेच नवीन विस्तार झालेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे तेथील नागरिकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार आटपाडी ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून निधी मंजूर करून त्यांचे पाईपलाईनचे काम सुरू करण्यात आले. त्या कामाची पाहणी आटपाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केली.यावेळी सोबत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे सल्लागार ॲड. धनंजय लक्ष्मणराव पाटील, इंजिनिअर शेख, उपसरपंच प्रा.डॉ.अंकुश कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी,  प्रकाश मरगळे, विजय पाटील, राजेंद्र बालटे, उमाकांत देशमुख, जिल्हा प्राथमिक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक यु. टी. जाधव, अनिता उत्तम जाधव, पीनु पंच उर्फ आप्पासाहेब माळी,मनोज देशपांडे, सुहास पाटील, सुखदेव पाटील व अन्य नागरिक उपस्थित होते. 

आटपाडी गावातील आणखी काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्या सर्व ठिकाणी तसेच आटपाडी गावाचा झपाट्याने विस्तार झालेला आहे व काही ठिकाणी होत आहे, त्या सर्व नवीन ठिकाणी नवीन पाईपलाईनचे काम आटपाडी ग्रामपंचायतमार्फत लवकरच करण्यात येणार आहे.तसेच आटपाडी गावातील काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे, ते रस्ते देखील थोड्याच दिवसात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील यांनी केले आहे.