जुना खराब माल विकल्यास कारवाई

अन्न व्यवसायिकांनी जुना खराब माल विक्री न करता नष्ट करावा अन्यथा कारवाई:सहायक आयुक्त (अन्न) सु.आ.चौगुले

अन्न उत्पादकांना वार्षिक,सहामाही परतावे सादर करण्यासाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
लॉकडाऊननंतर दिनांक 1 जूनपासून काही अटींवर दुकाने उघडण्यास शासनाने मुभा दिली आहे, परंतु सर्व अन्न व्यवसायिकांनी त्यांच्याकडे जुना खराब माल असल्यास तो ग्राहकांना विक्री न करता नष्ट करावा. जुना व खराब माल विक्री करीत असल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले  यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.अन्न उत्पादकांनी सन 2020-21 या वर्षाचा वार्षिक, सहामाही परतावा डी-१, डी-२ हा FosCos प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आवश्यक आहे. कायद्यातील तुरतुदीप्रमाणे वार्षिक/सहामाही परतावे हे त्या वर्षाच्या 31 मे पर्यंत सादर करणे आवश्यक असते. तथापि कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे परतावे सादर करण्यासाठी 30 जून 2021 पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक FosCos च्या साईटवर उपलब्ध आहे. यापूर्वी मेल वर किंवा प्रत्यक्ष कार्यालयात ज्या आस्थापनांनी डी-1, डी-2 सादर केला आहे, त्यांनी सुध्दा पुन्हा FosCos प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या परताव्याला दंड भरावा लागणार असल्याचे श्री. चौगुले यांनी स्पष्ट केले आहे.