तिसंगी येथील तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात!

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:

कवठेमहंकाळ तालुक्यातील तिसंगी येथील तलाठी रामू पांडुरंग कोरे (वय 43) सहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या आजोबांनी तक्रारदार व त्यांची आई यांच्या नावाने केलेल्या बक्षीसपत्राची हक्क-अधिकार पत्रकात नोंद धरण्यासाठी तिसंगी येथील तलाठ्याने तक्रारदाराकडे नऊ हजार रुपयांची लाच मागणी केली असल्याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे दिली होती. काल ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी करून तलाठी कोरे यांनी तक्रारदाराकडे चर्चेअंती सहा हजार रुपये लाचेची मागणी करून आज दिनांक ११ रोजी लाच रक्कम घेऊन येण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार तलाठी कार्यालय तिसंगी येथे सापळा लावण्यात आला. तलाठी कोरे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून तक्रारदाराकडून सहा हजार रुपये लाच स्वीकारली असताना रंगेहाथ पकडण्यात आले.कवठेमहंकाळ पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झाली. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे,अप्पर पोलीस उपायुक्त सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक प्रशांत चौगुले व गुरुदत्त मोरे तसेच पोलीस अंमलदार संजय संकपाळ, पोलीस नाईक धनंजय खाडे,प्रीतम चौगुले, चालक पवार, सहाय्यक पोलीस फौजदार रवींद्र धुमाळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय कलकुटगी, सलीम मकानदार, पोलीस कॉन्स्टेबल अविनाश सागर यांनी ही कारवाई केली.लाच मागणी संबंधाने तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बदाम चौक सांगली येथे अथवा दूरध्वनी 0233/ 2373095, हेल्पलाइन क्रमांक 1064 , व्हाट्सअप नंबर 7875333333 व मोबाईल नंबर 8975651262 तसेच संकेतस्थळावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.ःः