नाशिकच्या रूग्णालयात मृत्यूचे तांडव!

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे 22 रुग्ण दगावले!
पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्दैवी घटना!
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/नाशिक:
नाशिक येथील महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजनविना ११ पुरुष आणि ११ महिला अशा एकूण २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.ऑक्सिजनच्या गळतीमुळे हा प्रकार घडला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असून पालकमंत्री छगन भुजबळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते या घटनेचा आढावा घेत आहेत. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे नाशिकला रवाना झाले आहेत. रुग्णालय परिसरात मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला आहे.
नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील महानगरपालिकेचे हे रुग्णालय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करून सहवेदना व्यक्त केल्या आहेत. दुर्घटनेत निरपराध रुग्ण दगावल्याचे कळाल्यानंतर दुःख झाल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. बाधित व्यक्तींना लवकर बरे वाटावे यासाठी प्रार्थना त्यांनी केली आहे.दुर्घटनेस स्थानिक प्रशासन जबाबदार असून पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. प्रवीण दरेकर माहिती घेण्यासाठी नाशिकला रवाना झाले आहेत.
रुग्णालयामध्ये आँक्‍सिजनचा टँकर आला असताना ऑक्सिजन गळती होऊन हा प्रकार घडला.त्यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडून त्यांचा मृत्यू झाला.
दुपारी साडेबाराच्या सुमारास ऑक्सिजनची गळती सुरू झाली.त्यामुळे रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला.जवळपास १३१ रुग्ण ऑक्सिजनवर होते.रूग्णालयात १५० पैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.काही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. दरम्यान तीस ते पस्तीस रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतांच्या नातेवाईक वारसांना पाच लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर पालिकेनेही पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्र शोकमग्न असल्याची प्रतिक्रिया देऊन घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचेही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. उच्चस्तरीय चौकशी समितीमध्ये एक आयएएस अधिकारी, एक इंजिनियर व एक तज्ञ डॉक्टर या तिघांचा समावेश असल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर केले
.