विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारक निधीचा शासन आदेश काढा : विक्रम ढोणे


भूमीपूजनाची तारीख घोषित करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी


अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क:
सोलापूर :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी निधीची तरतूद केल्याचा शासन आदेश (जीआर) तातडीने काढावा, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या भूमीपूजनाची तारीख घोषित करावी, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.
यासंदर्भात ढोणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना मुंबईत निवेदने दिली आहेत.
ढोणे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवींचे स्मारक शासकीय निधीतूनच झाले पाहिजे, यासाठी सातत्याने
पाठपुरावा सुरू आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची सुरूवातीपासून याप्रकरणी सकारात्मक भूमिका राहिली आहे. शासकीय निधीची तरतूद करून ऑक्टोंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्मारकाचे भूमीपूजन होईल, असे त्यांनी जाहीर केले होते.मात्र त्यापद्धतीने काही घडले नाही. म्हणून 25 जानेवारी,2021 रोजी अभियानाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महिनाभरात स्मारकाची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिलेले आहे. त्यानंतर शासनाने स्मारकाला दीड कोटींचा निधी दिल्याच्या बातम्या आल्या आहेत, मात्र त्यासंबंधीचा शासन आदेश निघालेला नाही, त्यामुळे साशंकता आहे. यापार्श्वभूमीवर निधी दिला गेला असेल तर शासन आदेश का काढला गेला नाही? असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे.
निधी प्रस्तावित असेल आणि अर्थसंकल्पात तरतूद करायची असेल तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेवून हा निर्णय करावा, स्मारकाबरोबरच अहिल्यादेवी अध्यासनासाठी भरीव तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भूमीपूजनाची तारीख जाहीर करावी, असेही ढोणे यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून संवाद
विक्रम ढोणे यांनी निवेदने दिल्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या कार्यालयाकडून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. स्मारकासंबंधीच्या नेमक्या मागण्या, सूचना यासंबंधी चर्चा करण्यात आली.