वंचित बहुजन आघाडीचे सोमवारी ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली:

ऊस गळीत हंगाम सुरु होत असून ऊसदरावर तात्काळ तोडगा काढत उसाला किमान 3500 रु. प्रतिटन दर देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, दरवर्षीप्रमाणे ऊस दरावरून राजकारण न करता गाळप सुरु होण्यापूर्वी एफआरपी जाहीर करून किमान 3500 रु. प्रतिटन दर ठरविण्यात यावा, तसेच मागील वर्षी ऊसबिले थकविलेल्या साखर कारखान्यांना गाळपास परवानगी नाकारावी.त्याचप्रमाणे ऊस तुटल्यापासून 15 दिवसात ऊसबिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची लेखी हमी कारखानाचालकांकडून घेतलेशिवाय मोळी पूजनास परवानगी देऊ नये.
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने पुकारलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व युवक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांनी दिली.

शेतकरी संघटनांचे लक्ष राहणार
ऊस प्रश्नावर प्रथमच वंचित बहुजन आघाडीने भूमिका मांडल्याने याकडे सर्व शेतकरी संघटनांचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.