सांगलीत बांधकाम कामगारांचा इशारा१० मे रोजी धरणे आंदोलन

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
सांगली

जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास १० मे २०२६ रोजी विश्रामबाग येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

बांधकाम कामगार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये कामगारांच्या शिष्यवृत्ती अर्जांचा त्वरित निपटारा करणे, प्रलंबित स्किल ट्रेनिंग अर्ज मंजूर करून ४२०० रुपयांची मदत देणे, तसेच मृत कामगारांच्या वारसांना लाभाची रक्कम तातडीने वितरित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच ६० वर्षे पूर्ण झालेल्या कामगारांना नियमित पेन्शन सुरू करणे, अटल आवास योजनेअंतर्गत प्रलंबित घरकुल अर्ज मंजूर करणे आणि सांगली जिल्ह्यात गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कामगारांना निकृष्ट दर्जाचे साहित्य न देता दर्जेदार सुरक्षा संच उपलब्ध करून द्यावेत, सेतू केंद्रावर अर्ज दुरुस्ती प्रक्रिया सुलभ करावी, तसेच प्रमाणपत्र मिळविताना येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. याशिवाय घरकुल सर्वेक्षणात वंचित राहिलेल्या कामगारांसाठी पुन्हा सर्वेक्षण करावे आणि शिष्यवृत्ती तपासणी अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही संघटनांनी केली आहे.

दरम्यान, निवासी जिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांना विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले. यावेळी एकता जनरल कामगार संघटना महाराष्ट्र अध्यक्ष अनुप वाडेकर, महेश मदने, देवधर सांगले, मज्जीत शेख, विजय माळी, रोहन हर्ष, आम्रपाली कांबळे, परविन निशानदार, संजय माळी, तसेच पत्रकार विनायक सकपाळ उपस्थित होते.

मागण्या तातडीने मान्य न झाल्यास १० मे रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनांनी दिला असून “कामगार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.