आटपाडी नगरपंचायतीच्या प्रारुप विकास आराखड्यास अखेर स्थगिती

आमदार सुहास बाबर यांच्या मागणीवरुन नगरविकास खात्याचा आदेश
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

गेली अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या आटपाडी नगरपंचायतच्या विकास आराखड्याला अखेर आमदार सुहास बाबर यांच्या मागणीमुळे स्थगिती मिळाली असून आता नागरिकांच्या मागणीप्रमाणे व सर्वांना सामावून घेत नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे. पूर्वीच्या जुन्या विकास आराखडयाला स्थगिती मिळावी यासाठी आमदार सुहास बाबर यांनी याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी केली होती. त्यावर नगरविकास खात्याने सदर विकास आराखड्याला स्थगिती दिल्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे आमदार सुहास बाबर यांच्या आग्रही मागणीला यश आले आहे.

 6 जुलै रोजी आमदार सुहास बाबर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते कि आटपाडी नगरपंचायतीची निवडणूकही झालेली नाही. नगरपंचायतीवर प्रशासक आहेत. आटपाडी शहराचा प्रारुप विकास आराखडा नुकताच जाहीर केलेला आहे. विकास आराखडयातील आरक्षण, रस्ता, रिंगरोड याबाबत नागरिकांना काही माहिती नाही. तसेच हरकती, तक्रारी कशा पध्दतीने करावयाच्या याबाबत कोणतीही माहिती नाही. त्यामुळे नागरिकामध्ये संभ्रमाचे, भितीचे व संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे आटपाडी नगरपंचायतीच्या प्रारुप विकास आराखडयास स्थगिती द्यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री वा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
यापुढील आराखडा तयार करताना प्रस्तावित आरक्षणे, विकास योजना रस्ते इत्यादी बाबत स्थानिक नागरीकांकडुन प्राप्त झालेल्या सर्व हरकती/सुचना तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधीची निवेदने/प्रस्ताव विचारात घेऊन व याबाबत मुख्याधिकारी, आटपाडी नगरपंचायत, आटपाडी यांचेशी देखील सल्लामसलत करून प्रारुप आराखडयाच्या अनुसरुन उक्त विकास योजनेच्या अनुषंगाने परिपुर्ण व वस्तुनिष्ठ असा अहवाल शासनास सादर करा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
    स्व.आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नांनी आटपाडीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर केल्यानंतर कोट्यावधी रुपयांचा निधी आला आहे. ज्याप्रमाणे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर नागरिकांच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घ्यायचे अगदी त्याच पाऊलावर पाऊल ठेवून आमदार सुहास बाबर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आटपाडी नगरपंचायतचा आराखडा रद्द करावा अशी आग्रही भूमिका मांडली व त्याप्रमाणे नगरविकास खात्याकडून स्थगितीचा आदेश देखील काढला आहे. नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत आमदार सुहास बाबर यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.