
अथवा पुन्हा, स्वतंत्र तीन ग्रामपंचायती करा
सादिक खाटीक यांची मागणी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
करोडो किंमतीच्या जागांवर टाकलेल्या आरक्षणाच्या रोषातून मापटेमळा ग्रामस्थांचा पुढे आलेला प्रचंड विरोध लक्षात घेत आटपाडी नगरपंचायतीपासून मापटेमळा, भिंगेवाडी, आटपाडी ग्रामपंचायती पुन्हा निर्माण करा .
अथवा मापटेमळ्यासह पुर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचाच भाग असलेल्या लगतच्या ९ पैकी शेंडगेवाडी वगळता आटपाडीसह ९ गावांची आटपाडीची समृद्ध व बलवान आटपाडी नगरपालीका करा . अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभागाचे प्रदेशचे उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली आहे .
सुमारे ८५० ग्रामस्थांनी प्रसंगी रक्त सांडू, पण आम्हांला नगरपंचायतीतून बाजुला काढा . आम्हां शेतकरी, कष्टकऱ्यांच्या शेतजमीनीवर हेतुतः कचरा डेपो, उद्यान, मैदान वगैरेसाठी आरक्षण टाकण्याचा प्रकार अन्यायी आहे . मापटेमळा पुन्हा स्वतंत्र ग्रामपंचायत करा अन्यथा आटपाडी नगरपंचायती समोरच आमचा प्रपंच थाटून आम्ही आंदोलन करू, असा इशारा मापटेमळा ग्रामस्थांनी दिला आहे . साखर कारखाना वगैरे विविध व्यवस्था असणाऱ्या पुजारवाडीचा राजकाराणातूनच आटपाडी नगरपंचायतीत समावेश केला गेला नाही . मात्र मापटेमळा ग्रा . पं . चा आटपाडी नगरपंचायतीत समावेश करताना पक्षपातीपणा केल्याची लोकभावना मापटेमळा वाशीयांची दिसून आली आहे .
आटपाडी नगरपंचायत करण्यासंबंधीचे २०१२ साली शासनाने पहिले परिपत्रक काढल्याचे आणि २०१८ साली दुसरे परिपत्रक काढल्याचे ऐकीवात आहे . तथापी राजकारण्यांनी चालढकल करत ६ वर्षे घालवली आणि २० मे २०२२ रोजी आटपाडी ग्रामपंचायत बरखास्त करून आटपाडी नगरपंचायत जाहीर केली आणि आटपाडी ग्रामपंचायती पासून शेंडगेवाडी नवीन ग्रामपंचायत निर्माण केली गेली .
तथापि ३ वर्षे संपत आली, ना आटपाडी नगरपंचायतीची लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात आली, ना शेंडगेवाडी ग्रामपंचायत साकारली अथवा शेंडगेवाडीचे स्वतंत्र महसुली रेकॉर्ड निर्माण केले गेले . मुस्लीम नावांशी साधर्म्य असणाऱ्या गावांची नावे तातडीने बदलण्याची तत्परता दाखविणाऱ्या राज्य, केंद्रशासनाने आणि आटपाडीशी संबंधीत लोकप्रतिनिधींनी आटपाडी – शेंडगेवाडीच्या सोपस्करा संदर्भात तेवढी तत्परता दाखविली असती तर अधिक बरे झाले असते .
नगरपंचायत निर्मितीच्या पार्श्वभूमीवर गत १३ वर्षात आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपंचायत करण्याऐवजी, नगरपालीकाच करा, या न्याय्य मागणीकडे लक्ष न देता, राज्यकर्त्यांनी अन्यायच केल्याचे दिसून येते . स्वातंत्र्यानंतरच्या आटपाडी ग्रामपंचायतीत, १८ किमीवरील शेंडगेवाडी, ६ किमीवरील मुढेवाडी, आणि ४ किमी वरील देशमुखवाडी, खांजोडवाडी, मासाळवाडी, आणि लगतच्या पुजारवाडी यप्पावाडी, भिंगेवाडी, मापटेमळा या गावांचा समावेश होता .
या ९ गावांसह आटपाडी या मुख्य गावच्या एकत्रित ग्रामपंचायतीने काही दशके बिनबोभाट आपला कारभार केला . तथापि काळानुरूप विभक्त झालेल्या सर्व गावांची समृद्ध आणि बलवान नगरपालीका व्हावी, यासाठी शेंडगेवाडी वगळता पुन्हा ही उर्वरीत ८ गावे आटपाडीचा भाग बनवून नगरपालीका करणे न्यायाचे होते . तथापि आटपाडीकरांचा आवाज ऐकायचाच नाही, असे ठरविणारांना कसे गळी उतरावायचे हा खरा प्रश्न आहे . स्वातंत्र्यापूर्वी आटपाडीत १९३७ साली श्री . भवानराव म्युनिशिपल ऑफीस आटपाडी अर्थात नगरपालीका होती, असे स्पष्ट करणारे लिखाण,
आटपाडी नगरपंचायत इमारतीच्या दर्शनी दरवाजाच्या वर दगडात कोरलेले आजही आढळते . म्हणजे ९० वर्षापूर्वी, १९३७ साली औंध संस्थान अधिपतीनी आटपाडीला नगरपालीकेचा दर्जा दिला असेल तर आत्ताच्या राज्यकर्त्यांना आटपाडी नगरपालिका करण्याची का मानसिकता होत नाही .
२०१८ दरम्यान आटपाडी ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या प्रक्रिया वेळीच आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायतीत करण्याचा शासन निर्णय झाल्याचे ऐकून त्यावेळी सर्वांना आश्चर्यही वाटले होते. तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावच्या ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा शासननिर्णय २०१३ – १४ च्या दरम्यान झाला होता .
त्यानुसार जिल्ह्यातील जत, कवठेमहंकाळ, खानापूर, शिराळा, पलूस, कडेगांव या ठिकाणच्या नगरपंचायती अस्तित्वात आल्या. परंतू आटपाडीकरांना नगरपंचायत नको असल्याने हा निर्णय ५ वर्षे प्रलंबीत पडला होता. अशी वस्तुस्थिती असताना नगरपंचायत करण्याच्या झालेल्या निर्णयाने बहुतांश आटपाडीकरांमध्ये त्यावेळी नाराजीचे वातावरण पसरल्याचे सर्वज्ञात आहे . आज आटपाडी शहर ४ किमी परिघात पसरले आहे . आटपाडी गावच्या या सिमेपासून इतर ८ गावांचा विचार केल्यास काही गावे आटपाडीला लागूनच आणि काही गावे एक दोन किलोमीटर अंतरावरच आहेत.
आटपाडी नगरपालीका करताना या ८ गावांचा समावेश करुन आटपाडीसह ९ गावांची, सशक्त आटपाडी नगरपालीका केली जावी, ही मागणी गेली ११ वर्षे सातत्याने आम्ही करीत आलो आहोत. तथापी त्याकडे लक्ष दिले गेले नाही . तथापि नगरपंचायतीच्या या रेटून लादण्याच्या भावनेतून केल्या गेलेल्या निर्णयाचा, आटपाडी नगरपंचायतीची पहिली नवीन लोकनियुक्त बॉडी अस्तित्वात येण्यापूर्वीच तातडीने फेरविचार करून आटपाडी शहराच्या गतीमान, चौफेर आणि दिशादर्शक विकासासाठी आटपाडी नगरपालीका होणे गरजेचे, न्याय्याचे ठरेल . असे वाटत असल्याचे सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले . मापटेमळा वाशीय आटपाडी नगरपंचायतीपासून बाजूला होण्यासाठी आंदोलन छेडू लागलेत हे पाहता, आटपाडीची नगरपालीकाच करणे सर्व रोषांवर योग्य उपाय ठरू शकेल अन्यथा पुर्ववत आटपाडी, भिंगेवाडी, मापटेमळा ग्रामपंचायती निर्माण कराव्या लागतील . असेही सादिक खाटीक यांनी उपरोधीकपणे म्हंटले आहे .
सांगली, मिरज आणि कुपवाड नगरपालीकांचा विरोध मोडून काढून तत्कालीन मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या इच्छेखातर त्यावेळच्या मुख्यमंत्र्यानी सांगली – मिरज – कुपवाड महानगरपालीका निर्माण केली. विशेष म्हणजे मिरजेचे दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील सरांच्या अथक प्रयत्नातून साकारल्या गेलेल्या कुपवाड नगरपालीकेवर सहा महिन्याच्या आतच वरवंटा फिरवला गेला होता . नगरपालीका, महानगरपालीका अथवा एखादी महत्वपूर्ण बाब अस्तित्वात आणताना त्या, त्या गावांचा पाठींबा असो अथवा नसो, नगरपालीका, महानगरपालीका निर्मितीसाठी किती लोकसंख्या, मतदान लागते तेवढ्या प्रमाणात त्या, त्या गावांचा समावेश करुन नवनिर्मिती केली जाते,
हे सर्वश्रुत आहे. आणि असे असताना आटपाडी ग्रामपंचायतीची नगरपालीका करतानाच, अमक्या गावांचा ठराव पाहीजे, तमक्या गावांचा विरोध नको , अशा पालुपदाच्या आडून आटपाडीकरांच्या भावनेकडे आणि मागणीकडे दुर्लक्ष केले गेले, हे दुर्दैवी होते व आहे .
आटपाडी जवळील साखर कारखाना, सुतगिरणी, दूध संघ व अन्य महत्वाचे प्रकल्प इत्यादींचा संभाव्य नव्या नगरपालीकेच्या कार्यक्षेत्रात समावेश केला गेल्यास नव्याने अस्तित्वात येणारी आटपाडी नगरपालीका प्रारंभा पासूनच सक्षम होवू शकते. म्हणून आटपाडी नगरपालिकाच होण्यासाठी निर्णायक प्रयत्न व्हावेत .
नगरपंचायत अधिकाऱ्यांच्या आडून काही राजकारण्यांनी अनेक नागरीकांच्या करोडो किंमतीच्या जागांवर आरक्षण टाकले आहे . आता आरक्षण रद्द करण्याची भाषा करणारे नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणूकीनंतर पुन्हा विरोधक हेरून त्यांच्या जागावर आरक्षण टाकून त्यांची माती करणार नाहीत कशावरून ? या शंकेने असंख्य नगरवासीय धास्तावले आहेत .
आटपाडी आणि अन्य ८ गावामध्ये शासकीय जागा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होवू शकते . फक्त आटपाडी शहराचा विचार करायचा झाल्यास आटपाडी मध्ये महाराष्ट्र शासनाच्या जागा, देवस्थान इनाम वर्ग – ३ च्या जागा, अल्पसंख्य समाजाच्या नावच्या जागा, २ कि मी वरून आटपाडीकडे येणाऱ्या, साधारणतः ७५ – ८० मीटर रुंदीच्या विस्तीर्ण ओढा पात्रातील प्रचंड जागांवर, मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले गेले आहे . आजही अतिक्रमण करणे सुरूच आहे . या शासकीय जागांशी विकणाऱ्या आणि घेणाऱ्यांचा यत्किंचित संबंध नसताना, केल्या गेलेल्या बोगस नोंदीच्या आधारे, खरेदी दस्ताद्वारे आणि अनेक ठिकाणी रेटून केली गेलेली , या शासकीय जागांवरील अतिक्रमणे प्रथमत :
जमीनदोस्त केल्यास कमीत कमी ३० एकर इतकी जागा नगरपंचायतीस सहज उपलब्ध होवू शकेल . या सर्व जागांवर नगरपंचायतीने प्रथमतः आरक्षण टाकावे आणि नंतरच नागरीकांच्या जागांवर आरक्षण टाकण्याचा विचार करावा. अतिक्रमणे शोधताना भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्यांनीच या शासकीय जागांवर अतिक्रमण केलेले आढळून येईल . प्रथमतः ही अतिक्रमणे उध्वस्त करा . आणि मगच सर्वसामान्य अथवा विरोधकांच्या जागांवर आरक्षण टाका. अशा भावना सादिक खाटीक यांनी या निमित्ताने व्यक्त केल्या आहेत .


संबंधित बातम्या
वसंतराव काळे प्रशालेच्या मुलींच्या खो-खो संघाला तिहेरी मुकुट
*ज्येष्ठांचा सन्मान घोषणामध्ये नव्हे, जगण्यात दिसायला हवा !सादिक खाटीक
१ ऑक्टोबरला !आमदारांच्या दारात “पिठलं -भाकरी ठिय्या आंदोलन!”सादिक खाटीक यांची माहिती