मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन करणार
आटपाडी/ प्रतिनिधी:
भटकंती करून उपजीविका करणाऱ्या मेंढपाळांना राज्यात अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या मेंढपाळांना कोणत्याच सवलती शासन देत नाही. अर्थव्यवस्थेचा हा कणाच नेस्तनाबूत होत असताना मेंढपाळाच्या विविध मागण्यांसाठी आटपाडी तहसील व वनक्षेत्रपाल कार्यालयाला मेंढपाळ पुत्र आर्मीच्या वतीने विविध वीस मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संयोजक अर्जुन थोरात यांनी दिला आहे.आटपाडी तालुक्यातील मेंढपाळ व मेंढपाळ पुत्र तसेच धनगर ,बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेंढपाळांना महाराष्ट्रभर वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.तसेच महाराष्ट्रातील मेंढपाळ हा भटकंती करत आपली उपजीविका करत असल्याने, भटकंतीमध्ये अनेक हाल-अपेष्ठांना तोंड द्यावे लागते. त्यांना शासनाकडून कोणतीच योजना मिळत नसल्याची खंत मेंढपाळपुत्रांनी बोलून दाखवली.आज भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणुन मेंढपाळांकडे पाहिले जाते.परंतु आज कणाच नेस्तनाबूत होताना दिसत आहे.मेंढपाळांच्या विविध मागण्यांसाठी आटपाडी तहसीलदार व वनक्षेत्रपाल रोहयो यांना मेंढपाळ पुत्र आर्मीच्यावतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात साधारणतः २० मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील सर्व कुरणे व गायरान विकसित आणि मुक्त करून मेंढपाळांच्या नावे ७/१२ करावेत. महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळांमधून सुरक्षा कवच देण्यात यावे.सुरक्षा किटमध्ये मेंढरं कातरायची मशिन,फोल्ड करायचा तंबु, कुऱ्हाड, घोंगडी, टाॅर्च लाईट,मेंढ्या पाठी मागे वापरायच्या चपला,बंदुक या गोष्टीचा समावेश करावा.महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या मेंढ्या आडरानात आजारी पडल्यास दवाखाना उपलब्ध नसतो तर यासाठी पशु अॅब्युल्नस सुरू करावी.महाराष्ट्रातील मेंढपाळांना फिरते रेशनकार्ड देण्यात यावे.मेंढपाळांच्या मेंढ्या दगावल्यास शासनाने मेंढ्याचे पंचनामे करून मेंढपाळांना मेंढ्याचा विमा देण्यात यावा किंवा महामंडळातुन मेंढ्या देण्यात याव्यात.महाराष्ट्रातील मेंढपाळांचा मेंढ्यांच्या मागे मृत्यू झाल्यास पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळातून त्या मेंढपाळाला मेंढपाळ नेते कै.बबनराव थोरात यांच्या नावाने पाच लाख रुपये देऊन विशेष अर्थसहाय्य करावे.महाराष्ट्रातील मेंढपाळ वर्षभर भटकंती करणारा समुदाय आहे.त्यांची मुलं शिक्षणापासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहेत.कारण वसतीगृहात त्यांना जागा खूप कमी असतात. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मेंढपाळांच्या मुलांना स्वतंत्र वसतीगृह करावे व मेंढपाळांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात यावी.महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना घर बांधण्यासाठी शासनाकडून जमीन देऊन त्यांच्यासाठी अहिल्यादेवी होळकर घरकुल आवास योजनेंतर्गत घरे बांधून द्यावीत.महाराष्ट्रातील मेंढपाळांच्यावर हिंसक पशु,गावगुंड हल्ले करतात. त्यापासून संरक्षण करण्यासाठी बंदूक देण्यात यावी.महाराष्ट्रातील धनगर समुदायाला अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करावे.महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांवरील वाढते हल्ले लक्ष्यात घेता,त्यांच्यासाठी अॅट्राॅसिटीपेक्षा कडक कायदा करण्यात यावा.महाराष्ट्रातील मेंढपाळांची लोकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाने विकत घेऊन मेंढपाळांच्या लोकरीला प्रोत्साहन देण्यात यावे.मेंढपाळांची पशुवैद्यकीय अधिकारी मोठ्या प्रमाणावर पिळवणूक करतात, ती थांबविण्यासाठी मेंढपाळांच्या मेंढ्यांचा सर्वे करून मेंढ्यांच्या कळपावर जाऊन मेंढ्यांना मोफत वैद्यकीय औषधे देण्यात यावीत.पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाला महाराष्ट्र शासनाने त्वरित निधी द्यावा.मेंढपाळांच्या मेंढ्यांना हमीभाव द्यावा. दुष्काळसदृश्य भागात मेंढपाळांना शासनाने महामंडळाच्या माध्यमातून चारा छावण्या सुरू कराव्यात.महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या कलेला वाव देऊन गजीनृत्य/गजीढोल,कैपत्ये,धनगरी ओव्या सादर करणाऱ्या कलाकरांना शासकीय मानधन देण्यात यावे.महाराष्ट्रातील मेंढपाळ बांधवांना मेंढ्या खरेदी करण्यासाठी २० लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे.गेली ६० वर्ष डुबई कुरणांमध्ये असलेल्या ओढ्यात मेंढ्या पाणी पितात.डूबई ओढ्यासह आटपाडी तालुक्यात कुठेही मुक्या जनावरांना पाणी पिण्यास बंधन नसावे.आटपाडी तालुक्यासह महाराष्ट्रभर कुरणे,फाॅरेस्ट इतर शासकीय जमिनीमध्ये ५ वर्षांपूर्वी वृक्षारोपण केलेल्या क्षेत्रात मेंढ्या चारण्यास बंधन असू नये.
या २० मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर उग्र व तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. तसेच होणाऱ्या नुकसान भरपाईस महाराष्ट्र शासन सर्वस्वी जबाबदार राहील,असेही मेंढपाळ पुत्र आर्मीचे संयोजक अर्जुन थोरात बोलताना म्हणाले.यावेळी आटपाडी तालुक्यातील मेंढपाळ, मेंढपाळ पुत्र तसेच धनगर ,बहुजन समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक